युवासेना महानगरप्रमुखाच्या रौलेट अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By admin | Published: July 6, 2016 11:01 PM2016-07-06T23:01:36+5:302016-07-07T00:49:47+5:30
महानगरप्रमुखासह १४ जण ताब्यात : रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
महानगरप्रमुखासह १४ जण ताब्यात : रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
नाशिक : शिवसेनेच्या युवासेना महानगरप्रमुखाच्या बंगल्यात सुरू असलेल्या रौलेट जुगार अड्ड्यावार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पोलीस अधिकार्यांसह बुधवारी (दि़ ६)रात्री अचानक छापा मारला़ या ठिकाणी रौलेट जुगार खेळणार्या १४ जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या युवासेनेचा महानगरप्रमुख रुपेश शिवाजी पालकर याचा तपोवनात बंगला आहे़ या बंगल्यात कित्येक महिन्यांपासून रौलेट जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी सव्वानऊ वाजेच्या सुमारास पाटील यांनी सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर, म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह मोठा फौजफाटा घेऊन या जुगार अड्ड्यावर छापा टाकला़
पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी सुमारे १४ जण रौलेट जुगार खेळत होते़ पोलिसांनी या चौदा जुगार्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कमही हस्तगत केली आहे़ तसेच या बंगल्यावरील १४ संगणकांसह लाखो रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)