निजाम संग्रहालयातून चोरी झालेल्या वस्तू पोलिसांनी केल्या हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 03:58 AM2018-09-12T03:58:44+5:302018-09-12T03:58:50+5:30
निजाम संग्रहालयातून चोरी झालेला हिरेजडित टिफिन बॉक्स, माणिक जडविलेले कप व बशी, तसेच चमचा, अशा कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू पोलिसांनी पुन्हा हस्तगत केल्या आहेत
हैदराबाद : येथील निजाम संग्रहालयातून चोरी झालेला हिरेजडित टिफिन बॉक्स, माणिक जडविलेले कप व बशी, तसेच चमचा, अशा कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू पोलिसांनी पुन्हा हस्तगत केल्या आहेत. या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, या सर्व वस्तू शेवटचा व सातवा निजाम नवाब उस्मान अली खान बहादूर यांच्या मालकीच्या होत्या. २ सप्टेंबर रोजी या वस्तूंच्या झालेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी १५ विशेष पथके तयार केली होती. चेहरा झाकून घेतलेल्या दोन व्यक्ती पुरानी हवेली येथील या संग्रहालयातून बाहेर पडत असल्याचे व तेथून मोटरसायकलवरून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर झळकले होते. या चोरीमध्ये किमान दोन व्यक्तींचा हात असावा, असा पोलिसांचा संशय होता. त्यातील एकाने वस्तू ठेवलेल्या दालनातील झरोक्याची लाकडी चौकट मोडून आत प्रवेश केला होता. (वृत्तसंस्था)
>सोन्याच्या डब्यात जेवण!
निजामाचा हा डबा चोरणाºयापैकी एक जण रोज त्यात जेवण करायचा, असे पोलिसांना तपासात समजले. डबा चोरल्यानंतर चोर मुंबईला पोहोचले व लक्झरी हॉटेलमध्ये ते थांबले. ही चोरी शोधण्यासाठी पोलिसांची पथके तयार होती.
>निजामाच्या नातवाचे पोलिसांना पत्र
निजाम संग्रहालयामध्ये शेवटच्या निजामाच्या वडिलांच्याही अनेक मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तेथून चोरीला गेलेल्या वस्तूंचा लवकरात लवकर शोध लावण्यात यावा, असे पत्र शेवटच्या निजामाचा नातू व निजाम फॅमिली वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष नवाब नजफ अली खान यांनी हैदराबाद पोलीस आयुक्त अंजनीकुमार यांना गेल्या आठवड्यात लिहिले होते. संग्रहालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्दलही या पत्रात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.