पोलिसांनी रिक्रिएट केली अतिक-अशरफ हत्याकांडांची घटना; महत्वाची माहिती समोर येणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 04:28 PM2023-04-20T16:28:07+5:302023-04-20T16:28:52+5:30
15 एप्रिलच्या रात्री मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात माफिया अतिक अहमद व अशरफची हत्या झाली होती.
प्रयागराज: येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयाच्या गेटवर माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली. ती घटना आज पोलिसांनी रिक्रिएट केली. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी त्या घटनेचे नाट्य रुपांतर घडवून आणले, जेणेकरुन तपासात अधिक मदत होईल.
15 एप्रिलच्या रात्री याच ठिकाणी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची अगदी जवळून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यावेळी हल्लेखोर कुठे उभे होते, त्यांनी किती अंतरावरुन गोळ्या झाडल्या, पोलिसांना पोलिसांना प्रतिसाद द्यायला किती वेळ लागला इत्यादी प्रकारची माहिती आज गोळा करण्यात आली. यावेळी रुग्णालयाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एसआयटी टीमने प्रत्येक सेकंदाचा हिशोब नोंदवला आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरविंद कुमार त्रिपाठी, माजी डीजीपी सुभेश कुमार सिंह आणि माजी न्यायाधीश ब्रिजेश कुमार सोनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला आयोग या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तपासादरम्यान आयोग घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांचीही चौकशी करणार आहे. या प्रकरणाचा तपास 2 महिन्यांत पूर्ण करून अहवाल शासनाला सादर केला जाईल.