इमामाच्या मदतीने पोलिसांनी रोखली इसिसची भरती
By Admin | Published: June 14, 2015 02:44 AM2015-06-14T02:44:21+5:302015-06-14T02:44:21+5:30
धार्मिक जहालवादाच्या आहारी जात इस्लामिक स्टेट तथा इसिसच्या लढ्यात सामील होण्यासाठी थेट इराकची वाट धरू पाहणाऱ्या चार तरुणांना
डिप्पी वांकाणी , मुंबई
धार्मिक जहालवादाच्या आहारी जात इस्लामिक स्टेट तथा इसिसच्या लढ्यात सामील होण्यासाठी थेट इराकची वाट धरू पाहणाऱ्या चार तरुणांना या बेतापासून परावृत्त करण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) यश आले आहे. मुख्य म्हणजे मूलतत्त्ववादी बुद्घिभेदाच्या आहारी गेलेल्या या विशीतील युवकांना वेळीच रोखण्यात एका इमामाने एटीएसला मोलाचे सहकार्य केले. या युवकांवरील इसिसच्या तत्त्वप्रणालीचे भूत उतरविण्यासाठी एटीएसला तीन महिने लागले.
कल्याणच्या काही युवकांकडून प्रेरणा घेऊन ठाणे जिल्ह्याच्या मीरा रोडमधील नया नगरच्या चार युवकांनी इसिसच्या लढ्यात सामील होण्यासाठी इराकला जाण्याचा बेत आखला होता. याची कुणकुण काही खबऱ्यांना लागली होती. हे युवक कोण, त्यांचा बेत काय होता आणि ते त्यासाठी कसे प्रयत्न करीत होते, याबाबतची महत्त्वाची माहितीही खबऱ्याकडून मिळताच एटीएसने त्यांना वेळीच रोखले. धार्मिक शिकवणीबाबत या युवकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी इमामाने केलेली मदत हा या प्रक्रियेतील एक ठळक पैलू राहिला.
धर्मासंबंधीच्या खलिफाच्या विचाराने हे युवक प्रभावित झाले होते. ते अरीब माजीदचीही प्रशंसा करीत. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अगोदर या युवकांशी औपचारिक चर्चा केली. त्यातून असे लक्षात आले, की हे युवक इसिसच्या तत्त्वप्रणालीने चांगलेच प्रभावित झाले होते. त्यांनी इसिसबाबत आॅनलाइन बरीच माहितीही मिळविली होती. त्यानंतर पोलिसांनी पालकांसमक्ष या युवकांना बोलते केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीने त्यांच्या पालकांना धक्काच बसला.
कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी या युवकांचे समुपदेशन करण्याचा व खरा धर्म काय सांगतो, हे पटवून देण्यासाठी एका धार्मिक अभ्यासकाचे सहकार्य घेण्याचा मार्ग एटीएसने स्वीकारला. याला दुजोरा देताना एटीएसच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, लोकांचे समुपदेशन करणे एटीएसला बंधनकारक नाही. सामाजिक जबाबदारी म्हणून स्थानिक पोलिसांच्या पुढाकारातून आम्ही याकामी मदत केली.
होती करडी नजर
-आपल्यावर कोणाचीही पाळत नाही, असा या युवकांचा समज होता़ परंतु त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आणि त्यांच्या आपसातील संभाषणावर पोलिसांची बारीक नजर होती.
-एवढेच नाही तर हे युवक इतरांनाही इसिसला प्रेरित असलेल्या धर्माबाबत इतरांनाही उपदेश देऊ लागले होते. पाश्चात्त्य पोषाख नाकारत त्यांनी कुर्ता आणि पायजमा असा पेहरावही स्वीकारला होता.
-या घडामोडी कळताच एटीएसने कठोर पावले न उचलता त्यांचे मन वळविण्याचा चंग बांधला. एटीएस आपल्या मागावर आहे, हे या युवकांना कळू नये म्हणून साध्या वेषातील पोलीस पाठवून त्यांचे मन वळविण्यसाठी द्विस्तरीय योजना आखण्यात आली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.