फटाकेबंदी नियमाची जबाबदारी पोलिसांवर; सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 08:13 AM2021-10-31T08:13:01+5:302021-10-31T08:13:18+5:30
दिवाळीच्या आगमनास काही दिवसच उरले असून, त्या पार्श्वभूमीवर न्या. एम. आर. शहा व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवरील बंदीबाबतच्या आमच्या आदेशाचे अनेक राज्यांनी अद्याप पालन केलेले नाही. अशा फटाक्यांचे उत्पादन व विक्री अनेक ठिकाणी सुरू आहे. असे प्रकार यापुढे निदर्शनाला आल्यास त्या राज्यातील मुख्य सचिव व पोलीस आयुक्तांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
दिवाळीच्या आगमनास काही दिवसच उरले असून, त्या पार्श्वभूमीवर न्या. एम. आर. शहा व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा इशारा दिला आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवरील आमच्या आदेशाचे पालन न करण्याच्या गोष्टीची अतिशय गंभीर दखल घेतली जाईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले जात आहेत की नाहीत, याकडे राज्यांनी बारीक लक्ष द्यावे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, दिलेल्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. दुसऱ्यांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होईल, अशा पद्धतीने कोणीही सण साजरे करू नये. कोणालाही दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळ करू देणार नाही. विशेषत: ज्येष्ठ नागरिक व लहानग्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्यांनी केली डोळेझाक
मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन व विक्री यांच्यावरील बंदीचा आदेश अमलात आणण्याची एकतर राज्यांना इच्छा नाही किंवा या आदेशाचा भंग होत असल्याचे दिसत असूनही त्याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले आहे.