अखेर दोन साधुंच्या निर्घृण हत्येचं रहस्य उलगडलं; पोलीस तपासातून धक्कादायक सत्य समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:08 PM2020-04-28T13:08:58+5:302020-04-28T13:09:29+5:30
रात्रीच्या सुमारास दोन साधुंची निर्घृण हत्या
बुलंदशहर: पालघरमधील दोन साधुंच्या हत्येची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशातही दोन साधुंची हत्या झाल्याचा प्रकार घडला. बुलंदशहरमध्ये एका व्यक्तीनं मंदिर परिसरात दोन साधुंची धारदार शस्त्रानं हत्या केली. रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. त्यावेळी दोन्ही साधू झोपले होते.
उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगोना गावात एक शंकराचं मंदिर आहे. या शिवमंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधू जगनदास (५५ वर्षे) आणि सेवादास (३५वर्षे) राहात होते. काल रात्री त्यांची हत्या झाली. मंगळवारी सकाळी ग्रामस्थ मंदिरात पोहोचले. त्यावेळी दोन साधुंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचं आढळून आलं. यानंतर मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली. पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी पोलिसांनी खुन्याला ताब्यात घेतलं आहे. साधुंच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारा व्यक्ती नशेच्या आहारी गेल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर हत्येचं कारणदेखील सांगितलं. 'आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी साधुंचा चिमटा उचलला होता. त्यावरुन साधू त्याला ओरडले होते. त्यानंतर त्यानं काल रात्री साधुंची हत्या केली,' अशी माहिती बुलंदशहरचे एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी दिली.
लॉकडाऊन सुरू असताना साधुंची हत्या झाल्याची ही देशातली दुसरी घटना आहे. याआधी पालघरमध्ये जमावानं दोन साधू आणि त्यांच्या कार चालकाची निर्घृण हत्या केली. १६ एप्रिलच्या रात्री हा प्रकार घडला. पोलीस घटनास्थळी हजर असूनही हा प्रकार घडल्यानं विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.