हायकोर्ट नोंदविणार पोलीस उपनिरीक्षकाचे बयान
By admin | Published: January 23, 2015 11:06 PM2015-01-23T23:06:24+5:302015-01-23T23:06:24+5:30
अपवादात्मक प्रसंग : सावनेर तालुक्यातील हत्याप्रकरण
Next
अ वादात्मक प्रसंग : सावनेर तालुक्यातील हत्याप्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका हत्याप्रकरणातील तथ्यांमध्ये तफावत आढळून आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाचे अतिरिक्त बयान नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयात बयान नोंदविण्याचे प्रसंग क्वचितच येतात हे येथे उल्लेखनीय. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.मनोहर सुरजुसे (३२) असे आरोपीचे नाव असून तो केळवद येथील रहिवासी आहे. त्याच्यावर पत्नी शकुंतलाची जाळून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना २९ जानेवारी २०११ रोजी घडली होती. पोलीस उपनिरीक्षक नीलेश भदक यांनी शकुंतलाचे मृत्यूपूर्व बयान नोंदविले. त्यात शकुंतलाने मनोहरवर जाळल्याचा आरोप केला आहे. ३० जानेवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचे दोन्ही हात जळाले होते. यामुळे भदक यांनी आरोपीवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र दिले. त्या पत्रात शकुंतलाने स्वत:ला जाळून घेतले व तिला वाचविताना दोन्ही हात जळाले असे आरोपीने सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. भदक यांनी मृत्यूपूर्व बयान व पत्रात नोंदविलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याची बाब आरोपीचे वकील ॲड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे न्यायालयाने नीलेश भदक यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३९१ अंतर्गत अतिरिक्त बयान नोंदविण्यासाठी २९ जानेवारी रोजी उपस्थित ठेवण्याचे आदेश सरकारी वकिलाला दिले आहेत. बयान नोंदविताना आरोपीलाही उपस्थित ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष दुपारी २.३० वाजता हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.