सेवेप्रति पोलिसांची अटल बांधीलकी शौर्याच्या खऱ्या भावनेचे प्रतीक: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:38 AM2023-10-22T05:38:22+5:302023-10-22T05:38:41+5:30
आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करून सुरक्षा सुनिश्चित करणारे ते भक्कम आधारस्तंभ आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करून सुरक्षा सुनिश्चित करणारे ते भक्कम आधारस्तंभ आहेत. सेवेप्रतिची त्यांची अटल बांधीलकी शौर्याच्या खऱ्या भावनेचे प्रतीक आहे. ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व पोलिस जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘पोलिस स्मृती दिना’च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पोलिसांचे त्यांच्या समर्पणाबद्दल कौतुक केले. १९५९ मध्ये याच दिवशी लडाखमधील हॉट स्प्रिंगमध्ये चीनच्या सुरक्षा दलांशी लढताना १० शूर पोलिसांनी प्राणांची आहुती दिली होती. त्याची स्मृती म्हणून २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो.
दहशतवाद, घुसखोरीत ६५ टक्के घट : अमित शाह
ईशान्य तसेच जम्मू आणि काश्मिरातील दहशतवाद, नक्षलवाद आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये ६५ टक्के घट झाली असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे सांगितले. देशातील स्फोटक बिंदू असलेल्या नक्षलग्रस्त राज्ये, ईशान्येतील राज्ये, जम्मू व काश्मिरात आता शांतता प्रस्थापित होत आहे, असेही ते म्हणाले. पोलिस स्मृती दिनानिमित्त येथील राष्ट्रीय पोलिस स्मारकात शहीद जवानांना आदरांजली अर्पण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.