पाटणातील रालोसपाच्या मोर्चावेळी उपेंद्र कुशवाह यांच्यावर पोलिसांचा लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 04:36 PM2019-02-02T16:36:35+5:302019-02-02T16:37:23+5:30
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कुशवाह यांना जखम झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाटणा - बिहारमधील रालोसपाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह पोलिसांच्या लाठाचार्जमध्ये जखमी झाले आहेत. शिक्षण सुधारणेच्या मुद्द्यावरुन कुशवाह यांनी मोठा मोर्चा काढला होता. पटना येथील शासकीय वसतिगृहाच्या चौकात पोलिसांनी या मोर्चावर लाठीचार्ज केला. पोलीस आणि मोर्चेकरांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, त्यामध्ये कुशवाह हे जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कुशवाह यांना जखम झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपेंद्र कुशवाह यांच्यासमवेत काही कार्यकर्तेही पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले आहेत. पटना येथील डाक बंगल्याजवळ मोर्चाचे आगमन झाल्यानंतर मोर्चातील आंदोलक पुढे येण्यास सरसावले. त्यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना विरोध केला. त्यामुळे दोन्ही पक्षात वादावादी झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तर, पोलिसांच्या लाठीचार्जला उत्तर देताना, रालोसपाच्या कार्यकर्त्यांनीही लाठीचार्ज केला. दरम्यान, नितीश कुमारचे सरकार हे शिक्षण धोरणाच्याविरोधात आहे. त्यामुळेच पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचं उपेंद्र कुशवाह यांनी म्हटलंय. सध्या कुशवाह यांची प्रकृती उत्तम असल्याचे समजते.