'तो' मेलेला उंदीर तब्बल 10 तास पोलीस प्रोटेक्शनमध्ये होता!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:10 PM2019-05-27T12:10:27+5:302019-05-27T12:12:19+5:30
डोंगर पोखरून उंदीर निघाला ही म्हण अनेकदा ऐकली असेल. पण असाच एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे.
नवी दिल्ली - डोंगर पोखरून उंदीर निघाला ही म्हण अनेकदा ऐकली असेल. पण असाच एक प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे. दिल्ली पोलिसांना रात्री साडे बाराच्या सुमारास एक फोन आला. यामध्ये एका खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंध येत असल्याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र या प्रकरणाचा तपास करताना एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील गोविंदपूरी परिसरातून रात्री साडे बारा वाजता पीसीआरमध्ये एक कॉल आला. या कॉलवर खालच्या मजल्यावर असणाऱ्या बंद खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंध येत असल्याची तसेच भाडेकरू गायब असल्याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेजाऱ्यांनी भाडेकरू काही दिवसांपासून गायब असून घराला कुलूप लावण्यात आल्याचं पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी घर मालकाचा नंबर घेऊन त्याला फोन केला. मात्र त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. पोलिसांना याप्रकरणी शेजाऱ्यांकडे चौकशी केली त्यावेळी घरमालक आणि भाडेकरू काही दिवसांपासून गायब असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांना संशय आला. त्यांनी सकाळपर्यंत वाट पाहायची त्यानंतर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला. त्यामुळेच दुर्गंध येत असलेल्या त्या बंद खोलीबाहेर जवळपास 10 तास पोलिसांनी कडक बंदेबस्त ठेवला. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पोलिसांनी स्थानिक फॉरेन्सिक टीमलाही तपासासाठी घटनास्थळी बोलावले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अखेर घरमालकाशी संपर्क झाला. त्यावेळी त्याने काही दिवसांपूर्वी भाडेकरू घर सोडून गेला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घरमालकाला चावी घेऊन बोलावलं. कुलूप उघडून पोलिसांनी खोलीमध्ये तपास केला. पण त्यावेळी पोलिसांना समोर मेलेला एक उंदीर सापडला. काही दिवसांपासून उंदीर घरामध्ये मरून पडल्याने प्रचंड दुर्गंधी येत होती. पोलिसांनी जवळपास 10 तास मेलेल्या उंदीर असलेल्या घराबाहेर पहारा दिल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर पोलिसांनी घरमालकाला घराची स्वच्छता करण्याची सूचना दिली आहे.