... तरीही पोलीस तुमच्यावर कारवाई करणार नाहीत, भाजपा उमेदवाराचं मतदारांना 'इलेक्शन प्रॉमिस'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 03:10 PM2018-12-02T15:10:51+5:302018-12-02T15:11:49+5:30
राजस्थानमधील सोजत विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून शोभा चौहान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जयपूर - राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यात, जनतेला आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रलोभनं दाखविण्यात येत आहेत. तर, दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचाही झंझावत सुरू आहे. मात्र, सोजत विधानसभा मतदारसंघातील एका भाजपा उमेदवाराने जनतेला कायद्याच उल्लंघन करणारं वचन दिलं आहे. मला मतदान केल्यास बाल विवाह कायद्याची तुमच्यावर कारवाई होणार नाही, असे अजब वचन येथील उमेदवाराने दिले आहे.
राजस्थानमधील सोजत विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून शोभा चौहान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकांसाठी प्रचारसभेत बोलताना शोभा चौहान यांनी जनतेला अजबच प्रलोभन किंवा वचन दिलं आहे. मला मतदान केल्यास आणि मी सत्तेत आल्यास बालविवाह किंवा अल्पवयीन मुला-मुलींच्या विवाहात पोलीस कुठलीच कारवाई करणार नाहीत, असे विधान केलं. पिपलिया काला प्रदेशातील एका स्नेह संमेलनात बोलताना चौहान यांनी जनतेला हे वचन दिलं आहे. विशेष म्हणजे एका महिला उमेदवाराकडून असे कायद्याचे उल्लंघन करणारे वचन दिल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तर याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसही बजावली आहे.
पिपलिया येथे संध्यानाथजी महाराज यांच्या सानिध्यात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्थानिकांनी विवाह, मृत्यू आणि सामाजिक कार्यक्रमावेळी पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना, अल्पवयीन विवाहा केल्यानंतरही पोलिसांकडून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. सत्ता आणि पक्षसंघटन आपल्याकडेच आहे. त्यामुळे मला मतदान देऊन विजयी केल्यास तुम्हाला त्रास होणार नाही, असे शोभा चौहान यांनी म्हटले. चौहान यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने शोभा चौहान यांना नोटीस पाठवली.