VIDEO: रामनवमीच्या मिरवणुकीत तलवार घेऊन नाचताना दिसले पोलीस, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 10:23 AM2018-03-29T10:23:24+5:302018-03-29T12:23:10+5:30
हातात तलवारी घेऊन पोलिसांचा नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रांची- झारखंडच्या हजारीबागमध्ये रामनवमीच्या दिवशी भव्य मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत हातात तलवार घेऊन पोलीस कर्मचारी नाचताना दिसले. हातात तलवारी घेऊन पोलिसांचा नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तीन-चार पोलीस कर्मचारी जोरदार नाचताना दिसत आहेत. हजारीबागेतून भव्य रथयात्रा निघाली होती. लोकांची गर्दा पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा मिरवणुकीत शस्त्रांचं प्रदर्शन झालं. रामनवमीच्या या सोहळ्यात एकुण 528 लोक जखमी झाले होते तर गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यूही झाला.
दुसरीकडे, रामनवमी मिरवणुकीचा मार्ग बजरंग दलात्या कार्यकर्त्यांनी महुदी गावाच्या नदीजवळून जबरदस्तीने बदलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला. महुदी नदी येथे 1985 पासून रामनवमीची मिरवणूक जाण्यास बंदी आहे. ही पद्धत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बदलायची होती. रामनवमीच्या काही दिवसांपूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गावात बैठक घेऊन लोकांना मिरवणुकीत सहभाग घ्यायला सांगितला होता.