लालू प्रसाद यादवांच्या सुरक्षा रक्षकांनी नेल्या रुग्णालयातून गाद्या, उशा; रुग्णालायची पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 09:20 PM2021-03-09T21:20:46+5:302021-03-09T21:25:26+5:30
लालू प्रसाद यादव यांना सुरूवातीला उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी १२ पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी झारखंडमधील रिम्स रुग्णालयात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. परंतु एम्समध्ये त्यांना नेल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी काही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. रुग्णालयात त्या सुरक्षा रक्षकांना दिलेल्या गाद्या, उशा आणि त्याची कव्हर परत करण्याऐवजी ते सुरक्षा रक्षक आपल्यासोबतच घेऊन गेले. यानंतर रिम्स रुग्णालय प्रशासानानं झारखंड पोलिसांकडे पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे.
"लालू प्रसाद यादव जेव्हा केली बंगल्यात होते तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी १० पोलीस सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यांना गाद्या, उशा देण्यात आल्या होत्या. परंतु त्या ते आता परत करत नाहीत. यामुळे रिम्स रुग्णालयाला ससम्यांचा सामना करावा लागत आहे," अशा आशयाचं पत्र रुग्णालय प्रशासनानं झारखंड पोलिसांना लिहिलं. त्यांच्या या पत्रानंतर रांचीच्या एसएसपींनी त्वरित कारवाई करत पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयाचं सामान परत करण्याचा आदेश दिला आहे. तसंच यासाठी त्यांना २४ तासांचा अल्टिमेटमही देण्यात आला आहे.
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात रिम्स रुग्णालयातून एम्समध्ये हलवण्यात आलं होतं. रांचीमध्ये सुरू असलेल्या उपचारादरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यावेळी रिम्स रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी लालू प्रसाद यादव यांना निमोनिया झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांचं वय पाहता पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.