पनगढिया सोडणार नीति आयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:44 AM2017-08-02T00:44:47+5:302017-08-02T00:44:51+5:30
‘नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर रिजुवेनेटिंग इंडिया’ म्हणजेच ‘नीति’ आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया हे महिनाभरात हे पद सोडून पुन्हा अध्यापन क्षेत्राकडे वळणार आहेत.
नवी दिल्ली : ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर रिजुवेनेटिंग इंडिया’ म्हणजेच ‘नीति’ आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया हे महिनाभरात हे पद सोडून पुन्हा अध्यापन क्षेत्राकडे वळणार आहेत.
आयोगाच्या एका कार्यक्रमात स्वत: पनगढिया यांनी ही माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानून त्यांनी निरोपही घेतला. मोदी सरकारने पूर्वीचा नियोजन आयोग मोडीत काढून त्याजागी ‘निती’ आयोग नेमला आणि ५ जानेवारी २०१५ रोजी त्याचे उपाध्यक्ष म्हणून पनगढिया यांची नेमणूक केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या आयोगाचे अध्यक्ष आहेत.
पनगढिया म्हणाले, पदावरून मुक्त करावे, अशी विनंती मोदी यांना दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसार येत्या ३१ आॅगस्टपर्यंत मी आयोगाचे काम करीन. यापूर्वी डॉ. पनगढिया अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात जगदीश भगवती अध्यासनाचे प्राध्यापक होते.
ते म्हणाले की, माझी रजा येत्या ५ सप्टेंबरला संपत आहे. ३१ आॅगस्टपर्यंत आयोगाचे काम करून पुन्हा कोलंबिया विद्यापीठात अध्यापनाचे काम करण्याचे ठरविले आहे. विद्यापीठात जे काम करीत आहे ते सोडले तर आता वयाच्या ६४ व्या वर्षी मला तसे काम दुसरीकडे कुठे मिळणार नाही.
ख्यातनाम अर्थतज्ज्ञ-
पनगढिया हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ असून, त्यांनी अध्यापन करण्याआधी जागतिक बँक व आशियाई विकास बँकेतही मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम केलेय. भारतीय अर्थव्यवस्था हा त्यांच्या अभ्यास व संशोधनाचा विशेष विषय राहिला आहे. भारत सरकारने मार्च २०१२मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.