चित्रपट प्रमाणपत्राचे धोरणअधिक मुक्त !
By admin | Published: June 11, 2016 05:59 AM2016-06-11T05:59:46+5:302016-06-11T05:59:46+5:30
चित्रपट प्रमाणपत्र देण्यासंबंधी नियम अधिक मुक्त करण्यासह काही आमूलाग्र बदलांची घोषणा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले
नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत चित्रपट प्रमाणपत्र देण्यासंबंधी नियम अधिक मुक्त करण्यासह काही आमूलाग्र बदलांची घोषणा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाने(सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डाने सध्या वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटातील ८९ दृश्यांना कात्री लावल्याच्या विरोधात निर्मात्यांनी चित्रपट प्रमाणपत्र अॅपिलेट लवादाकडे (एफसीएटी) दाद मागितली आहे.
या चित्रपटाचे १७ जून रोजी प्रदर्शन ठरले असून त्याच दिवशी लवादाकडून सुनावणीची शक्यता आहे. उडता पंजाबच्या वादाबद्दल विचारण्यात आले असता जेटली म्हणाले की, मी हा चित्रपट बघितला नसल्यामुळे काहीही सांगू इच्छित नाही.
वादाचे कारण ठरलेले हे प्रकरणही मला माहीत नाही. चित्रपट प्रमाणपत्र देण्यासंबंधी सध्याच्या पद्धतीबाबत मी समाधानी नाही. त्यात बदल केले जातील. श्याम बेनेगल यांनी त्यावर अभ्यासपूर्ण अहवाल दिला आहे. त्याचा पहिला भाग माझ्याकडे आला असून तो सरकारच्या विचाराधीन आहे. येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण बदलांबाबत घोषणा केली जाईल. (वृत्तसंस्था)
>बेनेगल यांच्या समितीने सुचविले बदल...
चित्रपट प्रमाणपत्रांसंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या श्याम बेनेगल यांच्या समितीने काही बदल सुचविले असून प्रमाणपत्र देण्याबाबत निश्चित अशी यंत्रणा आणली जाईल. त्यासाठी सेन्सॉरशीप नव्हे सर्टिफिकेशन हाच शब्द अचूक ठरतो. चित्रपट प्रमाणपत्र प्रदान करण्यासंबंधी नियम अधिक मुक्त केले जातील, असेही जेटलींनी येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केले.