पाच वर्षांनंतर हैदराबादेत आढळला पोलिओचा विषाणू
By admin | Published: June 16, 2016 04:11 AM2016-06-16T04:11:50+5:302016-06-16T04:11:50+5:30
देशातून पाच वर्षांपूर्वी नाहिसा झालेला पोलिओचा विषाणू हैदराबादमध्ये सापडल्यानंतर तेलंगण सरकारने एकप्रकारे ‘जागतिक आणीबाणी’चीच घंटा वाजविली आहे. हैदराबादेतील एका नाल्यातून
हैदराबाद : देशातून पाच वर्षांपूर्वी नाहिसा झालेला पोलिओचा विषाणू हैदराबादमध्ये सापडल्यानंतर तेलंगण सरकारने एकप्रकारे ‘जागतिक आणीबाणी’चीच घंटा वाजविली आहे. हैदराबादेतील एका नाल्यातून घेतलेल्या नमुन्यामध्ये हा सक्रिय विषाणू (पी२ स्ट्रेन) आढळला.
पोलिओचा विषाणू आढळल्यानंतर राज्य सरकारने जिनेव्हा येथून लगेच पोलिओविरोधी लस मागविण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. खबदारीची उपाययोजना म्हणून हैदराबाद आणि रंगा रेड्डी या दोन जिल्ह्यांमधील सुमारे तीन लाखापेक्षा जास्त बालकांना पोलिओ डोज पाजला जाणार आहे.
मागील पाच वर्षांपासून भारतात कुठेही व्हॅक्सीन डिराईव्हड पोलिओ व्हॉयरस आढळला नव्हता. तसेच कुठेही पोलिओग्रस्त बालक आढळले नाही. परंतु हैदराबादशी सतत संबंध असणारे आजूबाजूचे देश किंवा पश्चिम आशियातून हा पोलिओचा विषाणू आला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून व्यापक लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे तेलंगण सरकारने म्हटले.
‘सरकारने हैदराबाद आणि रंगा रेड्डी जिल्ह्यात २० जून ते २६ जूनपर्यंत पोलिओविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे राज्याचे प्रमुख सचिव (आरोग्य) राजेश्वर तिवारी यांनी सांगितले. पोलिओचा विषाणू आढळण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश आणि एवढेच नव्हे तर दिल्लीतही पोलिओचा विषाणू आढळला होता, असे तिवारी म्हणाले. गेल्या १७ मे रोजी सांडपाणी प्रक्रिया प्लांटतर्फे हैदराबादच्या विविध भागातील नाले व गटारीमधील ३० नमुने गोळा करण्यात आले होते. त्यापैकी अंबरपेठ सांडपाणी प्रक्रिया प्लांटमधून गोळा केलेल्या एका नमुन्यात हा पोलिओचा विषाणू आढळला. (वृत्तसंस्था)
भारत पोलिओमुक्त
हैदराबाद येथे पोलिओचा विषाणू आढळल्यानंतर भारत सरकारने एक निवेदन जारी करून, भारत अद्यापही पोलिओमुक्त असल्याचा दावा केला आहे. ‘देशाने वाईल्ड पोलिओ विषाणूचे पूर्णपणे निर्मूलन केलेले आहे.
पोलिओचा शेवटचा रुग्ण १३ जानेवारी २०११ रोजी आढळला होता. तेव्हापासून भारतात कुठेही पोलिओचा विषाणू आढळला नाही,’ असे या निवेदनात म्हटले आहे. देशात पोलिओचा विषाणू (पी२ स्ट्रेन) आढळल्याचे वृत्त साफ खोटे आहे, असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.
- हैदराबादेत आढळलेला पोलिओ व्हॉयरस स्ट्रेन हा कदाचित व्हॅक्सीन डिराईव्हड पोलिओ व्हॉयरस (व्हीडीपीव्ही) असू शकतो. परंतु हैदराबद किंवा जवळपासच्या भागांमध्ये एकाही बालकाला या विषाणूची लागण झाल्याचे दिसून आलेले नाही. व्हीडीपीव्ही आढळल्यामुळे भारताचा पोलिओमुक्त दर्जा बदलणार नाही, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.