बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले

By admin | Published: September 23, 2015 10:37 PM2015-09-23T22:37:51+5:302015-09-23T22:37:51+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून ढोलताशे आणि नगाऱ्यांचे आवाज घुमू लागले आहेत

Political atmosphere in Bihar has become hot | बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले

बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले

Next

नवी दिल्ली/पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून ढोलताशे आणि नगाऱ्यांचे आवाज घुमू लागले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी बुधवारी महाआघाडीच्या २४२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव यांनी तिसऱ्या आघाडीच्या वतीने मुख्यमंत्रिपदासाठी मुस्लिम चेहरा पुढे करून रणसंग्रामातील रंगत वाढविली आहे.
भारतीय जनता पार्टीने स्टार प्रचारक म्हणून ज्येष्ठ नेतेद्वय लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
महाआघाडीचे उमेदवार जाहीर
दरम्यान, संजद नेते नितीशकुमार यांनी पाटण्यात महाआघाडीत सहभागी संजद, राजद आणि काँग्रेस उमेदवारांची संयुक्त यादी जाहीर करताना यात समाजाच्या सर्व वर्गांना प्रतिनिधित्व देण्यात आले असल्याचा दावा केला.
नितीशकुमार यांनी सांगितले की, घटक पक्षांसोबत प्रदीर्घ चर्चेनंतर २४२ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आणि घटक पक्षांनी ही नावे संयुक्तपणे जाहीर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. शिल्लक एका जागेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा एकदोन दिवसात केली जाईल. निवडणुकीत विकास हा सर्वात मोठा मुद्दा राहणार आहे. विकासाच्या गप्पा मारणारा भाजप प्रत्यक्षात धर्म व जातीच्या आधारे फूट पाडण्याचे राजकारण करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

पाटणा : आरक्षण धोरणाचा फेरविचार केला जावा, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर चौफेर टीका होऊ लागली आहे. भागवत यांचे विधान घातक असल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली. तात्त्विक मार्गदर्शक असलेला रा.स्व. संघ म्हणजे भाजपसाठी सुप्रीम कोर्ट आहे, असेही ते म्हणाले.
भाजप, रा.स्व. संघ आरक्षणविरोधी असून आरक्षणाच्या फेरविचारासाठी संघाने घटनाबाह्य मंडळ स्थापन करण्याची मागणी पुढे आणली आहे.
नवी दिल्ली : संयुक्त जनता दल आणि राजद या आघाडीतील मित्रपक्षांना राहुल गांधी बिहार निवडणूक प्रचार मोहिमेत नको असल्याने त्यांना ‘सक्तीच्या सुटीवर’ पाठविण्यात आल्याची शक्यता आहे, असे सांगत भाजपने काँग्रेस उपाध्यक्षांच्या अमेरिका दौऱ्यावर शरसंधान केले आहे ‘राहुल गांधी अमेरिकेतील अ‍ॅस्पेन येथे एका संमेलनात भाग घेण्यासाठी गेल्याचे आम्ही ऐकले आहे. त्यांनी भारतात कधीही कोणत्या संमेलनाला संबोधित केलेले नाही. ते ‘ज्ञान नसलेले विशेषज्ञ’ आहेत. बिहारच्या महाआघाडीतील नेत्यांनी सल्ला दिल्यामुळेच काँग्रेसने राहुल गांधी यांना बळजबरीने सुटीवर पाठविले आहे असे दिसते. कारण राहुल गांधी हे बिहारच्या जवळपास जरी फिरकले तरी निवडणुकीत मोठी हानी होऊ शकते असा अंदाज त्यांना आला असेल, अशी टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी यावेळी केली.

राहुल यांच्यावर टीका करण्यापेक्षा आश्वासनांच्या पूर्ततेकडे लक्ष द्या- काँग्रेस
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावर भाजपने प्रखर टीका केली आहे. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते आर.पी.एन. सिंग म्हणाले, भाजपने काँग्रेस उपाध्यक्षांवर हल्ला करण्यापेक्षा जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

समाजवादी पार्टीच्या नेतृत्वातील तिसऱ्या आघाडीने बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी मुस्लिम उमेदवाराचे नाव जाहीर करून वेगळी कलाटणी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले असल्याची घोषणा सपा प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी केली. महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर मुलायमसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह तिसरी आघाडी उतरविली आहे
(वृत्तसंस्था)

Web Title: Political atmosphere in Bihar has become hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.