खोट्या बातम्यांच्या आधारे राजकीय पक्ष परस्परांविरुद्ध छेडतील आभासी युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:42 AM2019-03-28T01:42:35+5:302019-03-28T01:43:14+5:30
खोट्या बातम्यांना वेळीच आळा न घातल्यास लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्ष या बातम्यांच्या आधारे आभासी जगात परस्परांविरुद्ध एक प्रकारचे युद्धच छेडतील असा इशारा निवडणूक प्रचार या विषयातील तज्ज्ञ शिवमशंकर सिंह यांनी दिला आहे.
नवी दिल्ली : खोट्या बातम्यांना वेळीच आळा न घातल्यास लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राजकीय पक्ष या बातम्यांच्या आधारे आभासी जगात परस्परांविरुद्ध एक प्रकारचे युद्धच छेडतील असा इशारा निवडणूक प्रचार या विषयातील तज्ज्ञ शिवमशंकर सिंह यांनी दिला आहे.
मणिपूर व त्रिपुरा विधानसभा निवडणुकांत भाजपाकरिता माहिती विश्लेषण व प्रचारमोहिमांची आखणी याचे काम शिवमशंकर सिंह यांनी केले होते. त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. राजकारणातील अंतर्गत प्रवाह कसे असतात, पक्षांचे काम कसे चालते, निवडणुका जिंकण्यासाठी विविध पक्ष काय डावपेच आखतात याचे सखोल विश्लेषण शिवमशंकर सिंह यांनी केले आहे.
त्यांच्या ‘हाऊ टू विन अॅन इंडियन इलेक्शन : व्हॉट पॉलिटिकल पार्टीज डोन्ट वॉन्ट यू टू नो' या आपल्या नव्या पुस्तकात याचे वर्णन केले आहे. निवडणूक प्रचारासाठी तज्ज्ञमंडळी काय सल्ला देतात, सर्वेक्षण, माहिती विश्लेषण तसेच पर्यायी माध्यमांचा प्रचारासाठी कसा वापर केला जातो याचीही माहिती या पुस्तकात आहे.
त्यांनी सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्ष व्हॉट्सअॅप, फेसबुक व इतर संकेतस्थळांवर सर्रास खोट्या बातम्या पसरवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कृतीतून राजकीय पक्ष आपल्या मनातील हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. या बातम्यांची संख्या इतकी मोठी असते की त्यांना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी खूपच सजग राहायला हवे.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजपा हुशार
शिवमशंकर सिंह म्हणाले की, या तंत्रज्ञानाचा निवडणुका जिंकण्यासाठी फायदा होऊ शकतो, ही गोष्ट पहिल्यांदा भाजपाला समजली. गेल्या निवडणुकीत समाज माध्यमांचा हुशारीने वापर करून भाजपाने विजय मिळविला. या सर्व गोष्टींवर नरेंद्र मोदी लक्ष ठेवत. या निवडणुकांत काँग्रेसची अत्यंत नकारात्मक प्रतिमा भाजपाने तयार केली. मनमोहनसिंग दुबळे नेता असल्याचे जनमानसावर बिंबवले. घोटाळ््यांची माहितीही झळकावली.