‘पुरस्कार वापसी’ हा राजकीय कट - RSS
By admin | Published: October 30, 2015 10:17 PM2015-10-30T22:17:23+5:302015-10-31T08:40:38+5:30
पुरस्कार परत करणारी ‘गँग’ ही लोकांनी ज्यांचे विचार ऐकणे बंद केले आहे अशा हताश, निराश आणि समाजाने वाळीत टाकलेल्या तथाकथित बुद्धिवाद्यांची टोळी आहे.
रांची : पुरस्कार परत करणारी ‘गँग’ ही लोकांनी ज्यांचे विचार ऐकणे बंद केले आहे अशा हताश, निराश आणि समाजाने वाळीत टाकलेल्या तथाकथित बुद्धिवाद्यांची टोळी आहे आणि ही टोळी केवळ आपली राजकीय दुकानदारी चालविणे आणि चर्चेत येण्यासाठीच असे करीत आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साहित्यिक, लेखक, चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी केलेल्या ‘पुरस्कार वापसी’वर तोफ डागली आहे.
संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी शुक्रवारी रांची येथे पत्रकारांशी बोलताना वरीलप्रमाणे टीकास्त्र सोडले. देशाच्या विविध क्षेत्रातील लोकांकडून पुरस्कार परत केले जाण्याच्या कृतीवर नाराजी व्यक्त करताना होसबळे म्हणाले, ‘जे लोक देशात ६० वर्षांपासून असहिष्णुतेचा नंगानाच करीत होते, ते आता षड्यंत्र रचत आहेत आणि संघ व भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’
होसबळे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठकीनिमित्त रांची येथे आले आहेत. हा मोदी सरकार आणि संघाला विनाकारण घेरण्याचा राजकीय कट आहे, ज्यात हे मुठभर तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक पुरस्कार परत करण्याचे राजकारण करून कधीही शयस्वी होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
होसबळे पुढे म्हणाले, ‘लोकांनी त्यांचे विचार ऐकणेही बंद केलेले आहे. परिणामी आपले दुकान पुन्हा चमकविण्यासाठी हे लोक असे वागत आहेत. पुरस्कार परत करणाऱ्यांची ओळख आणि विश्वासार्हता काय आहे? ते जर शास्त्रज्ञ असतील तर एखाद्या शास्त्रज्ञांच्या चर्चेत का सहभागी होत नाहीत?’
ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांनी गुरुवारी आपला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता. त्याबद्दल विचारले असता होसबळे लगेच म्हणाले, ‘त्यांनी कोणत्या वैज्ञानिक विषयावर चर्चा केली आहे? देशात गेल्या अनेक दशकांपासून झालेल्या असहिष्णुतेच्या काळात ते आणि त्यांच्यासारखे लोक कुठे होते? त्यांनी पुरस्कार का परत केले नाही?
संघ काही ‘पंचिंग बॅग’ नाही, जिला कुणीही काहीही बोलत राहावे आणि कसलेही आरोप करीत राहावे, असे निक्षून सांगत होसबळे म्हणाले, अशा मुठभर साहित्यिक, चित्रपट निर्मात्यांच्या चुकीच्या वक्तव्याने संघाची प्रतिमा खराब होऊ शकत नाही. देशाच्या जनतेला सर्वकाही कळते.’ (वृत्तसंस्था)
मुंबई : विधायक टीका करून सरकारला मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देशभरातील लेखक, साहित्यिक आणि शास्त्रज्ञ देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल संताप व्यक्त करीत आपले पुरस्कार परत करीत आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शुक्रवारी ‘लोकमत कॉन्क्लेव्ह’मध्ये आपले मत मांडले.
‘लेखक, साहित्यिक व शास्त्रज्ञ आपापले पुरस्कार परत करीत आहेत, ही अतिशय दु:खद बाब आहे. आम्ही (सरकार या नात्याने) त्यांचा खूप आदर करतो. दादरी हत्याकांडानंतर त्यांनी पुरस्कार परत करायला सुरुवात केली आहे. दादरीची घटना अतिशय दुर्दैवी आहे व अशा घटना पुन्हा घडायला नको, असे मला वाटते,’ असे फडणवीस म्हणाले.