अरुणाचलमध्ये पुन्हा राजकीय भूकंप, काँग्रेसच्या 42 आमदारांचा राजीनामा
By admin | Published: September 16, 2016 02:20 PM2016-09-16T14:20:02+5:302016-09-16T14:20:02+5:30
काँग्रेसच्या 42 आमदारांनी राजीनामा दिला असून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आहे. 42 आमदारांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांचादेखील समावेश आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
इटानगर, दि. 16 - अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप आला असून काँग्रेसच्या हातून पुन्हा एकदा सत्ता गेली आहे. काँग्रेसच्या 42 आमदारांनी राजीनामा दिला असून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आहे. 42 आमदारांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांचादेखील समावेश आहे. अरुणाचलमध्ये आता पुन्हा एकदा काँग्रेससमोर राजकीय संकट निर्माण झालं आहे. काँग्रेसचा फक्त एक आमदार मागे राहिला आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभेत ६० जागा असून यातील ४४ जागांवर काँग्रेसचे तर 11 जागांवर भाजपाचे आमदार आहेत. खांडू पक्षात दाखल झाल्यावर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल भाजपप्रणित पूर्वोत्तर विकास आघाडीत सामील होणार आहे. काँग्रेसचा जो एक आमदार मागे राहिला आहे त्यांचं नाव नाबाम तुकी आहे. जे दोन आमदार अपक्ष निवडून आले होते त्यांनदेखील पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार आले आणि पेमा खांडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 'मी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आम्ही पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती दिली आहे,' असं पेमा खांडू यांनी सांगितलं आहे.
राज्यपालांच्या निर्देशानुसार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी नबाम तुकी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. नंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ३६ वर्षांचे पेमा खांडू यांची नेतेपदी निवड करण्यात आली. सहा महिन्यांपूवी खालिको पुल यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून पक्ष सोडून गेलेले काँग्रेसचे सर्व ३० आमदार स्वगृही परतले व त्यांनी खांडू यांचे नेतृत्त्व मान्य केले. बैठकीनंतर खांडू राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे गेले आणि त्यांनी ४५ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला.