"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 07:37 PM2024-10-06T19:37:48+5:302024-10-06T19:39:02+5:30
"जेडीयू 8 ऑक्टोबरची वाट बघत आहे. भाजप नितीश यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. दोन्ही राज्यांचे निकाल येताच भाजपची उलटी गिनती सुरू होईल."
येणाऱ्य 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच बिहारमध्येही राजकीय भूकंप होईल. बिहार मध्यावधी निवडणुकीकडे वाटचाल करणार आहे. जेडीयू 8 ऑक्टोबरची वाट बघत आहे. भाजप नितीश यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. दोन्ही राज्यांचे निकाल येताच भाजपची उलटी गिनती सुरू होईल. जेडीयू आणि भाजप यांच्यात प्रत्येक मुद्द्यावर संघर्ष आहे, असे आरजेडी प्रवक्ता मृत्युंजय तिवारी यांनी म्हटले आहे.
"निकालाचा बिहारमध्ये मोठा साइड इफेक्ट दिसणार" -
मृत्युंजय तिवारी म्हणाले, जेडीयू नितीश यांना पंतप्रधान करण्याची आणि त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहे. राजद नितीश यांना कधीही सोबत घेणार नाही. कारण, 'बिहार की जनता की है पुकार, अबकी बार तेजस्वी की सरकार'. हरियाणा, जम्मू-काश्मीरच्या एक्झिट पोलचे निकाल खरे ठरतील. दोन्ही राज्यात भाजपचा क्लीन स्वीप होणार आहे. 8 ऑक्टोबरच्या निकालाचा बिहारमध्ये मोठा साइड इफेक्ट दिसेल.
खरे तर, 8 ऑक्टोबरला लागणाऱ्या निवडणूक निकालापूर्वी, शनिवारी एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले. या आकड्यांवर काँग्रेस खूश दिसत आहे. हरियाणात काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीरसाठी काही एक्झिट पोल नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवत आहेत. तर काही आघाडीला बहुमतापासून 10 ते 15 जागा दूर दाखवत आहे.
जम्मू-काश्मीरच्या एक्झिट पोलमध्ये आघाडीला 'आघाडी' -
जम्मू-काश्मीरमध्ये आघाडीला 40 तर भाजपला 30 जागा मिळण्याची शक्यता एक्झिटपोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, पीडीपी आणि इतरांना प्रत्येकी 10 जागा मिळू शकतात आणि ते किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. मात्र, हे केवळ अंदाज आहेत. खरी स्थिती 8 ऑक्टोबरलाच समोर येईल आणि जनतेने आपल्यासाठी कोणता पक्ष योग्य मानला हे स्पष्ट होईल. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजावर बोलताना, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालानंतर, बिहारचे राजकीय वातावरणही बदलेल असे बिहारमधील विरोधक म्हणू लागले आहेत.