पंचरंगी लढतीत राजकीय गरबो रमतो जाय!

By admin | Published: September 29, 2014 07:12 AM2014-09-29T07:12:28+5:302014-09-29T07:12:28+5:30

घटस्थापनेच्या मुहूर्तावर युतीचा घटस्फोट आणि आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे नागपूर जिल्ह्यातील राजकारणात गत दोन दिवसांपासून राजकीय गरबा रंगला आहे

Political gambling in the five-star match! | पंचरंगी लढतीत राजकीय गरबो रमतो जाय!

पंचरंगी लढतीत राजकीय गरबो रमतो जाय!

Next

घटस्थापनेच्या मुहूर्तावर युतीचा घटस्फोट आणि आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे नागपूर जिल्ह्यातील राजकारणात गत दोन दिवसांपासून राजकीय गरबा रंगला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात पंचरंगी सामना होईल, असे संकेत आहेत.
मात्र सध्याची राजकीय परिस्थिती बघता जिल्ह्यात काँग्रेस-भाजपात बिग फाईट होईल. नागपुरातील काटोल आणि हिंगणा मतदार संघ वगळता राष्ट्रवादीने १० मतदारसंघात फ्रेश चेहरे मैदानात उतरविले आहेत. त्यांचा विधानसभेच्या आखाड्यातील पहिलाच अनुभव आहे. हीच स्थिती शिवसेना, मनसे आणि बसपाची आहे. मात्र तिकिट वाटपात काँग्रेस आणि भाजपाने केलेले स्कॅनिंग पोलपंडितांसाठी आव्हान ठरणार आहे!
महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे संख्याबळ लक्षात घेत भाजपा जिल्ह्यात नंबर वन आहे. सध्या भाजपाचे जिल्ह्यात सात आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत शहरातील सहाही मतदार संघात भाजपने लीड घेतली होती. त्यामुळे पक्षाने चारही विद्यमान आमदारांवर विश्वास ठेवत त्यांना परत रिंगणात उतरविले आहे. यात मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस (दक्षिण-पश्चिम नागपूर), सुधाकर देशमुख (पश्चिम नागपूर), कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर) तर विकास कुंभारे (मध्य नागपूर) यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या उत्तर नागपुरात मंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध डॉ. मिलींद माने तर दक्षिण नागपुरात काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याविरुद्ध नगरसेवक सुधाकर कोहळे यांना भाजपने संधी दिली आहे. फडणवीस यांच्या विरोधात माजी मंत्री विनोद गुडधे पाटील यांचे पुत्र नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना मैदानात उतरविले आहे़ काँग्रेसने शहरात उमेदवारी वाटपात ‘यंग ब्रिगेडला संधी, तर जुन्यावर विश्वास’ हा मंत्र जोपासला आहे. काँग्रेसने शहराध्यक्ष विकास ठाकरे (पश्चिम नागपूर), प्रफुल्ल गुडधे (दक्षिण-पश्चिम), अ‍ॅड. अभिजीत वंजारी ( पूर्व नागपूर) या यंग ब्रिगेडला तर मंत्री नितीन राऊत ( उत्तर नागपूर), माजी मंत्री अनिस अहमद (मध्य नागपूर), माजी मंत्री सतीश चतुर्वेदी (दक्षिण नागपूर) या जुन्या दिग्गजावर विश्वास ठेवला आहे. शहरातील दक्षिण नागपूर मतदारसंघात काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. शिवसनेने येथे किरण पांडव यांना संधी दिली आहे.
नागपूर ग्रामीणमध्ये कामठी मतदारसंघात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटस्थ राजेंद्र मुळक यांना उमेदवारी देत काँग्रेसने राजकीय बॉम्ब फोडला आहे. तिथे त्यांचा मुकाबला भाजपाचे विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी होईल. हिंगण्यात गतवेळी निसटता पराभव स्वीकारणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग यांच्याविरोधात भाजपने पक्षात नव्यानेच आलेले समीर मेघे यांना संधी दिली आहे.
येथे शिवसेनेने माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या हातात धनुष्य दिले आहे. ही जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. उमरेडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार सुधीर पारवे यांच्याविरोधात काँग्रेसचे बंडखोर राजू पारवे यांनी दंड थोपटले आहे. येथे काँग्रेसने संजय मेश्राम यांच्यावर विश्वास टाकला आहे.

Web Title: Political gambling in the five-star match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.