बंगाली चित्रपटसृष्टीचा राजकीय प्रवासही गंमतीदार; आता तृणमूल व भाजपकडे कल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:47 AM2021-03-09T05:47:40+5:302021-03-09T05:48:12+5:30
मिथुनदाच्या राजकारणाचे वर्तुळ झाले पूर्ण
कोलकाता : दक्षिणेच्या राजकारणावर असलेला तेथील चित्रपटसृष्टीचा प्रभाव सर्वज्ञात आहे; पण बंगाली चित्रपटसृष्टीही पश्चिम बंगालच्या राजकारणात कायम सक्रिय राहिली आहे. एके काळी काँग्रेस व डाव्या पक्षांवर टॉलीवूडचा प्रभाव होता; पण आता ती चित्रपटसृष्टी तृणमूल व भाजपमध्ये विभागली गेली आहे.
राज्यात काँग्रेसची सत्ता असताना उत्तम कुमारसारखा लोकप्रिय अभिनेता काँग्रेसचा समर्थक होता. इतरही अनेक होते. काँग्रेस व उत्तम कुमार यांचे समर्थक व चाहते करोडो होते. पुढे त्याचवेळी सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक, उत्पल दत्त या डावीकडे झुकणाऱ्या मंडळींचाही राजकारणावर प्रभाव दिसत होता. तो त्यांच्या चित्रपटांवरही दिसत होता. नक्षलवादी चळवळही वाढत असताना बंगाली चित्रपटांत सामाजिक व राजकीय विषय अधिक होते. पुढे यांचे टॉलीवूडवरील वर्चस्व कमी होत गेले. आर्थिक उदारीकरणामुळे हिंदीप्रमाणेच बंगाली चित्रपटांचे विषय व मांडणी यातही बदल होत गेला. समाजाच्या आचारविचारांत बदल झाला. त्यामुळे डाव्यांच्या हातून सत्ता गेली, डावी चळवळ कमजोर झाली आणि काँग्रेसची दुरवस्थाच झाली.
मिथुनदाच्या राजकारणाचे वर्तुळ झाले पूर्ण
n चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या राजकारणाचे वर्तुळ रविवारी पूर्ण झाले. एके काळी डाव्या पक्षांबरोबर असणाऱ्या, नक्षलवादी चळवळीचे समर्थन करणाऱ्या आणि नक्षलवादी नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या मिथुनदांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
n डाव्या पक्षांना सोडून त्यांनी नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात आले; पण ते राज्यसभेत फारसे फिरकलेच नाहीत. शारदा चिट फंड घोटाळ्यात त्यांचे नाव आले, त्यांची ईडीमार्फत चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता भाजपची वाट धरली.