राजकीय पक्षांचा ‘हवाई’ प्रचार जोरात
By admin | Published: September 25, 2014 04:22 AM2014-09-25T04:22:19+5:302014-09-25T04:22:19+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उरलेले कमी दिवस आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यास लागणारा कालावधी पाहता अनेक राजकीय पक्षांनी जलद सेवा म्हणून हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांची निवड केली
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उरलेले कमी दिवस आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यास लागणारा कालावधी पाहता अनेक राजकीय पक्षांनी जलद सेवा म्हणून हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांची निवड केली आहे. हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांसाठी प्रत्येक तासाला लाखो रुपये भाडे कंपन्यांकडून आकारण्यात येत असले तरी ते देण्याची तयारी राजकीय पक्षांनी दाखविली आहे. सध्या महाराष्ट्रात प्रचारासाठी ४0 पेक्षा अधिक हेलिकॉप्टर आणि छोटी विमाने कार्यरत झाली आहेत.
राज्यभर १५ आॅक्टोबरला एकाच वेळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हे पाहता प्रचार करण्यासाठी फारच कमी कालावधी आहे. जागावाटपाचा घोळ आणि त्यातच पितृपक्षामुळे तिकिट वाटपच न झाल्याने उरलेल्या दिवसांत प्रचार करणे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना फारच अवघड जाणार आहे.
प्रत्येक ठिकाणी प्रचारासाठी पोहोचायचे कसे, असा प्रश्न असणाऱ्या नेत्यांनी यासाठी हॅलिकॉप्टर आणि छोट्या विमानांची निवड केली आहे. छोट्या अंतराच्या ठिकाणी पोहोचण्यासाटी हॅलिकॉप्टर तर लांबच्या अंतरासाठी विमाने नेत्यांकडून वापरण्यात येणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे हॅलिकॉप्टरचे प्रत्येक तासाला भाडे ७५ हजार ते १ लाख २५ हजार रुपये आणि विमानाचे भाडे हे प्रत्येक तासाला १ लाख ते दीड लाखपर्यंत आकारण्यात येत असले तरी राजकीय पक्षांनी या जलद सेवेसाठी पैसे देण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या ४0 पेक्षा अधिक हेलिकॉप्टर आणि विमाने कार्यरत झाल्याचे उड्डाण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास ३0 हेलिकॉप्टर आणि विमाने वापरण्यात आली होती.