कुस्तीपटूंच्या आंदोलनात उतरले राजकीय पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:48 PM2023-04-25T12:48:01+5:302023-04-25T12:48:45+5:30
अन्यायाविराेधात सुप्रीम काेर्टात याचिका
आदेश रावल
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाने राजकीय वळण घेतले आहे. आंदाेलनावर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, काही पक्षांचे नेते कुस्तीपटूंना भेटले. सोमवारी रात्री आंदोलक कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी ट्विट केले की, आपण मंगळवारी आंदोलनस्थळी जाणार आहोत. तर, पंतप्रधानांनी या मुद्द्यावरून मौन सोडावे, अशी मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसने म्हटले की, ज्यांनी देशाचा जगात नावलौकिक केला ते खेळाडू लैंगिक छळाविरोधात न्याय मागण्यासाठी जंतरमंतरवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. तरीही कारवाई होताना दिसत नाही. क्रीडा मंत्रालयाने महासंघाच्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती दिली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला निवडणूक घेण्यासाठी समिती स्थापन करण्यास सांगितले आहे.