नेहरू विद्यापीठात राजकीय रणकंदन

By Admin | Published: February 14, 2016 03:43 AM2016-02-14T03:43:17+5:302016-02-14T03:43:17+5:30

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हय्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी आणखी २0 संशयित विद्यार्थ्यांची यादी तयार केली आहे.

Political tragedy at Nehru University | नेहरू विद्यापीठात राजकीय रणकंदन

नेहरू विद्यापीठात राजकीय रणकंदन

googlenewsNext

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हय्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी आणखी २0 संशयित विद्यार्थ्यांची यादी तयार केली आहे. त्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेतील नेते डी.राजा यांची कन्या अपराजिता हिचे नाव आल्यामुळे हा वाद पेटला असून, त्याचे राजकीय रणकंदनात रूपांतर झाले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संध्याकाळी विद्यापीठाला भेट दिली, तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.
देशविरोधी घोषणांच्या पार्श्वभूमीवर कन्हय्याला अटक झाल्यानंतर, डावे पक्ष व संयुक्त जदच्या नेत्यांनी शनिवारी गृहमंत्री राजनाथसिंगांची भेट घेतली. कन्हय्याच्या सुटकेची मागणी करताना त्यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतले.
आणीबाणीसारखे वातावरण
त्यानंतर माकपचे महासचिव सीताराम येचुरी म्हणाले, जेएनयूमध्ये आणीबाणीसारखे वातावरण तयार झाले आहे. वसतिगृहांमध्ये घुसून पोलीस कोणाचीही धरपकड करीत आहेत. अभाविपच्या चिथावणीनुसार देशातील मान्यवर शिक्षण संस्थांना टार्गेट केले जात आहे. कन्हय्याची अटकच बेकायदेशीर आहे
डी.राजांचे गिरींना खुले आव्हान
भाजपचे खा. महेश गिरींनी व्हिडिओ क्लिप जारी करून, त्यात डी.राजांची कन्याही सहभागी असल्याचा आरोप केला होता. या आरोपांचे त्वेषाने खंडन करतांना डी.राजा म्हणाले, कोणीही सुज्ञ माणूस माझी कन्या अपराजिताच्या देशभक्तीबाबत शंका घेणार नाही. जेएनयूच्या कँपसमधे सीसीटीव्ही कॅमेरे नसताना संशय निर्माण करणारी क्लिप आली कुठून, ती कोणी कोणाला दिली, त्याची सत्यता कोण पडताळणार याची उत्तरे खा. महेश गिरींनी द्यावीत, असे आव्हान दिले.
देशद्रोहासाठी ठोस पुरावा हवा
काँग्रेस प्रवक्ते डॉ.अभिषेक सिंगवी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की जोपर्यंत प्रत्यक्ष कृतीची जोड नसेल, तर केवळ शब्दांनी कोणी देशद्रोही ठरत नाही. समजा कोणी एखादे भाषण दिले, जे राष्ट्रविरोधी असल्याचे दुसऱ्याला भासत असेल तर तेवढ्यावर तो गुन्हा ठरत नाही.
राहुल यांची टीका
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी जेएनयूमध्ये तिथे गेले. त्यापूर्वी ते म्हणाले की, भारतविरोधी घोषणांचे काँग्रेस समर्थन करीत नाही, मात्र पोलीस जे करीत आहे, ते आक्षेपार्ह आहे. जेएनयू हे आपल्या मतानुसार चालणारे विद्यापीठ नसल्याने मोदी सरकार, अभाविप तिथे दबावतंत्राचा अवलंब करू पाहत आहेत.
भाजपचा पलटवार
डावे पक्ष आणि काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा म्हणाले, कोणत्याही देशद्रोह्याला भाजप आणि केंद्र सरकार कदापि माफ करणार नाही. जद(यू) ने बिहारमधे घडणाऱ्या घटना आधी थांबवाव्यात. हेच लोक दहशतवादी इशरत जहाँला कालपर्यंत बिहारकी बेटी म्हणत होते.
आनंद शर्मा यांचा आरोप
काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यासह निषेध सभा आटोपून परतत असताना आपल्यावर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रात्री उशिरा एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

जेएनयूतील प्रकाराने व्यथित माजी सैनिकांची पदवीवापसीची धमकी
या विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेल्या काही माजी सैनिकांनी या विरोधात आपली पदवी परत करण्याची धमकी दिली आहे.
देशविरोधी कारवायांचा अड्डा बनलेल्या विद्यापीठाशी आपले नाव जोडणे आता कठीण झाले असल्याची भावना या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज पुन्हा जेएनयूमधील वादावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना कुठल्याही निर्दोष व्यक्तीला त्रास दिला जाणार नाही. परंतु दोषींवर मात्र कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

हाफिज सईदची भाषा बोलताहेत राहुल -भाजप
जेएनयू विद्यार्थी नेत्याच्या अटकेवर टीका करणाऱ्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि इतर नेत्यांवर प्रहार करताना हे नेते दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची भाषा बोलत असून हा शहिदांचा अपमान आहे. त्यांच्या अशा वक्तव्याने राष्ट्रविरोधी शक्तींचे मनोबल वाढेल,असा आरोप भाजपाने केला.

Web Title: Political tragedy at Nehru University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.