जम्मू-काश्मीरमधील राजकीय पेच कायम
By admin | Published: December 30, 2014 11:44 PM2014-12-30T23:44:29+5:302014-12-30T23:44:29+5:30
पीडीपी आणि दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा दोन्हींकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तास्थापनेबाबत कुठलेही ठोस संकेत मिळालेले नाहीत़
श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मिरात नवे सरकार स्थापनेबाबतचा राजकीय पेच अद्यापही कायम आहे़ सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला पीडीपी आणि दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा दोन्हींकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तास्थापनेबाबत कुठलेही ठोस संकेत मिळालेले नाहीत़
जम्मू-काश्मीरच्या ८७ सदस्यीय विधानसभेत २८ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती उद्या बुधवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत़ तर भाजपा येत्या गुरुवारी आपला औपचारिक प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे़
पीडीपी सर्व पर्यायांवर विचार करीत असून, राजकीय पेच अद्यापही कायम आहे. मेहबूबा मुफ्ती बुधवारी राज्यपालांना भेटणार आहेत, असे पीडीपी प्रवक्ते नईम अख्तर यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले़
नव्याने निवडणुका घ्या : जेकेएनपीपी
जम्मू : जम्मू-काश्मिरात राजकीय पक्षांकडून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप जेकेएनपीपीने केला आहे़ हा घोडेबाजार रोखण्यासाठी राज्यपालांनी राजकीय पक्षांसोबतची चर्चा रद्द करावी आणि राज्यात नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही या पक्षाचे अध्यक्ष भीमसिंह यांनी मंगळवारी केली़
लोन यांना हवे स्थिर सरकार
पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद गनी लोन यांनी जम्मू-काश्मिरातील स्थिर आघाडी सरकारची अपेक्षा व्यक्त केली आहे़ आम्ही राज्यात कुठल्याही स्थिर सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत़, असे लोन म्हणाले़
(वृत्तसंस्था)
जम्मू-काश्मिरातील राजकीय पेच कायम असताना, नॅशनल कॉन्फरन्सच्या (एनसी) १५ सदस्यीय विधिमंडळ दलाने एक प्रस्ताव संमत करून पीडीपीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे़ एनसीचे सरचिटणीस अली मोहम्मद सागर यांनी मात्र हे वृत्त स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे़
पीडीपीला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांना आमच्या नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल, असे आम्ही तोंडी स्वरूपात म्हटलेले आहे़ मात्र पीडीपीला पाठिंबा देणारा प्रस्ताव संमत करण्याबाबतचे वृत्त निराधार आहे, असे ते म्हणाले़
श्रीनगर : जम्मू-काश्मिरात भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेसने पीडीपीला सावध केले आहे़ पीडीपीचे संरक्षक मुफ्ती मोहम्मद सईद राज्यातील वर्तमान राजकीय स्थितीत सर्वाधिक योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे़
केंद्रातील सत्तारूढ वर्गाकडून विशेष लाभ घेण्यासाठी पीडीपीला भाजपासोबत सरकार स्थापन केले पाहिजे, असा सल्ला मुफ्ती मोहम्मद सईद यांना दिला जात आहे़ पण मी वैयक्तिकरीत्या सईद यांना विकासाच्या नावावर दिल्या जाणाऱ्या या सल्ल्याबाबत सावध करू इच्छितो़ हा सल्ला म्हणजे दूरदृष्टीचा अभाव असलेला सल्ला आहे, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सैफुद्दीन सोज मंगळवारी म्हणाले़
जम्मू : जम्मू-काश्मिरातील सरकार स्थापनेच्या चर्चेसाठी भाजपाच्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने आज मंगळवारी राज्यपाल एऩएऩ व्होरा यांची भेट घेतली़ येत्या गुरुवारी पक्ष राज्यपालांना आपला औपचारिक प्रस्ताव सादर करील, असे या शिष्टमंडळाने सांगितले़
भाजपा सरचिटणीस राम माधव आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर शर्मा यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली़ यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षनेते येत्या १ जानेवारी रोजी राज्यपालांची भेट घेऊन, त्यांना सरकार स्थापनेबाबतचा आपला प्रस्ताव सोपवतील़ राज्यपालांसोबतची आजची भेट राज्यात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेचा एक भाग समजता येईल़ सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे़ या प्रक्रियेदरम्यान राज्यपालांसोबत चर्चा होते़ मात्र १ तारखेला आम्ही त्यांच्याशी औपचारिक चर्चा करू.