यूपीमध्ये राजकीय यात्रांची जोरदार धूम
By admin | Published: September 11, 2016 07:03 AM2016-09-11T07:03:46+5:302016-09-11T07:03:46+5:30
उत्तर प्रदेशच्या निवडणूक रिंगणात राजकीय यात्रांची धूम सुरू झाली आहे. भाजपची तिरंगा यात्रा व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या किसान यात्रेनंतर आता सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव
मीना कमल, लखनौ
उत्तर प्रदेशच्या निवडणूक रिंगणात राजकीय यात्रांची धूम सुरू झाली आहे. भाजपची तिरंगा यात्रा व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या किसान यात्रेनंतर आता सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी संदेश यात्रेद्वारे काँग्रेस व भाजपच्या यात्रांना प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांत यात्रा काढण्याची चढाओढ लागल्यामुळे उत्तरप्रदेश ढवळून निघाला असून राज्यात निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मुलायमसिंह यांची संदेश यात्रा शनिवारी सुरू झाली. चार टप्प्यांत होणाऱ्या या यात्रेत मुलायमसिंह सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर ठेवतील.
पहिल्या टप्प्यात ही यात्रा राज्याच्या विविध जिल्ह्यांत फिरून २० सप्टेंबरला राजधानी लखनौला परतेल. याच पद्धतीने आॅक्टोबरमध्ये दुसरा टप्पा, नोव्हेंबरमध्ये तिसरा टप्पा व डिसेंबरमध्ये या यात्रेचा चौथा टप्पा पार पडेल. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीही स्वतंत्र यात्रा प्रस्तावित आहे. भाजप आणि काँग्रेसने सर्वप्रथम यात्रा काढून आघाडी घेतली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची किसान यात्रा सुरू आहे. देवरिया येथून निघालेली २१ दिवसांची ही यात्रा संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे.
सध्या या यात्रेचा उत्तरप्रदेशात पाचवा दिवस आहे. गेल्या महिन्यात भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत मोहनलालगंज येथून तिरंगा यात्रा काढली. पंधरा-पंधरा दिवसांचे टप्पे असलेली ही यात्रा राष्ट्रभक्तीबाबत जागृति घडवून आणण्यासाठी काढल्याचे सांगितले जात असले तरी या यात्रेमागेही उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूकच आहे.
नितीश कुमार, अजितसिंह यांचीही तयारी
बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयु नेते नितीशकुमार, राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजितसिंग हेही यात्रेच्या तयारीत आहेत. काँग्रेस आणि सपाच्या यात्रा संपल्यानंतर त्यांच्या यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. बसपाने मात्र यात्रांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, बसपाप्रमुख मायावती यांनी आपल्या निवडणूक प्रचार फेऱ्या सुरू केल्या आहेत.