तरुणाईला बॉलिवूडची कोडी सोडवण्यात रस; त्यांचं देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष- चेतन भगत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 07:03 PM2020-09-14T19:03:07+5:302020-09-14T19:08:23+5:30
देशातील जनतेलाच अर्थव्यवस्थेची काळजी नसेल, तर राजकारणी अर्थव्यवस्थेची काळजी का करतील?; भगत यांचा सवाल
देश सध्या अतिशय मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र या संकटाकडे देशातील तरुणांचं लक्ष नाही. नागरिकांनी अशाच प्रकारे देशाच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लत्र केल्यास देशाची अवस्था आणखी बिकट होईल, असं मत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि त्याकडे जनतेचं होत असलेलं दुर्लक्ष याबद्दल आपली परखड मतं व्यक्त केली.
'देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत. लोकांना अर्थव्यवस्थेची काळजी नसल्याचं सरकारला माहीत असतं. त्यामुळेच सरकारदेखील अर्थव्यवस्थेतील संकटं दूर करण्यासाठी वेळ खर्च करत नाहीत. लोकच ढासळलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत नसतील. त्यांनाच काळजी नसेल, तर मग राजकारणी तरी अर्थव्यवस्थेची काळजी का करतील?,' असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे.
ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरण- अमोल कोल्हे
ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारीवरही चेतन भगत यांनी भाष्य केलं. 'पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एक तर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल? याचा विचार करण्यात त्यांचा वेळ जाईल,' असं भगत म्हणाले.
चेतन भगत यांनी नुकतंच एका स्तंभामध्ये देशातील सध्याच्या आर्थिक संकटाबाबत लिहिलं होतं. जर या परिस्थितीवर तोडगा काढला गेला नाही, तर सर्वसामान्य जनता आणखी गरीब होत जाईल, असं भगत यांनी म्हटलं. तरुणांनी आता आपल्या मोबाईल फोनकडे पाहणं थांबवायला हवं आणि अर्थव्यवस्थेबद्दल बोलायला हवं. सध्याच्या क्षणाला भारतीय तरुण त्यांच्या अवतीभवती काय घडतंय याकडे दुर्लक्ष करत आहेत,' असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला होता.