‘सर्जिकल स्ट्राइक्स’वरूनही राजकारण
By admin | Published: October 5, 2016 05:02 AM2016-10-05T05:02:20+5:302016-10-05T05:02:20+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद््ध्वस्त केल्याचा भारताचा दावा ही लोणकढी थाप असल्याचा कांगावा पाकिस्तान करीत असतानाच भारतातही विरोधी पक्षांतील
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद््ध्वस्त केल्याचा भारताचा दावा ही लोणकढी थाप असल्याचा कांगावा पाकिस्तान करीत असतानाच भारतातही विरोधी पक्षांतील काही नेत्यांनी या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’च्या खरेपणाबद्दल शंका घेणारी वक्तव्ये केल्याने आणि भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत याचा राजकीय लाभ घेण्यासाठी फलक लावल्याने मंगळवारी दिवसभर हा विषय राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय ठरला. काँग्रेस आणि भाजपाने परस्परांवर देशभक्तीचे राजकारण केल्याचा आरोप केला.
एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी न सोडणाऱ्या आम आदमी पार्टीचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी मोदींची प्रशंसा करताना, पाकचा अपप्रचार आणि खोटेपणा उघड करण्यासाठी सरकारने ‘सर्जिकल स्ट्राइक्स’चा तपशील जाहीर करावा, अशी कोपरखळी मारली होती. ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनीही सत्ताधारी पक्ष आणि सरकार याचे राजकारण करत असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवत म्हटले की, यापूर्वीच्या सरकारच्या काळातही अशी लष्करी कारवाई केली गेली होती, पण त्याचा असा डांगोरा पिटला गेला नव्हता.
या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांनी एक पाऊल पुढे टाकत ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ना ‘बनावट’ (फेक) संबोधणारे टष्ट्वीट केल्याने वातावरण तापले. यावरून निरुपम यांना भाजपाने फैलावर घेतलेच, पण खुद्द काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सायंकाळी निरुपम यांचे ते खासगी मत आहे व त्याच्याशी पक्ष सहमत नाही, असे स्पष्ट केले. मात्र देशात व्यक्त होत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी सरकारने या कारवाईचा तपशील जाहीर करून शंकाखोरांना गप्प करावे, अशी मागणी करत जवानांच्या प्राणाहुतीचे राजकारण केले जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
फलकांवरून पेटला वाद
काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या या चिमट्यांना भाजपातर्फे उत्तर प्रदेशमध्ये लावलेल्या फलकांचाही संदर्भ होता. या पक्षांच्या काही नेत्यांनी समाजमाध्यमांवर भाष्य करताना या फलकांची छायाचित्रेही टाकली. ‘सर्जिकल स्ट्राइक्स’बद्दल भारत सरकार व लष्कराचे अभिनंदन करणाऱ्या या फलकांवर पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या फोटोंसोबत या कारवाईची माहिती देताना लष्कराचे ‘डीजीएमओ’ लेफ्ट. जनरल रणवीर सिंग यांनी केलेली स्फूर्तिदायक विधानेही छापलेली होती. भाजपातर्फे केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री रविशंकर प्रसाद व पक्ष प्रवक्ते संबित पात्रा यांनी शंकाखोरांवर प्रतिहल्ला चढवला.
वाढता मूलतत्त्ववाद हा गंभीर धोका
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि वाढता मूलतत्ववाद हे आमच्या सुरक्षेला सगळ््यात गंभीर धोके आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले.
सिंगापूर आणि भारत यांच्यात येथे प्रतिनिधी पातळीवर झालेल्या चर्चेनंतर सिंगापूरचे पंतप्रधान ली सिन लूंग यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले, ‘‘त्यांनी आमच्या समाजाच्या मूलभूत रचनेला धोका निर्माण केला आहे. शांतता आणि मानवता यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी या संकटाविरुद्ध एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे.’’ ली लूंग यांनी उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला व या हल्ल्यांत मरण पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांविषयी सांत्वनाची भावना व्यक्त केली.
शांतता हवी : भारत आणि पाक यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांनी शांतता आणि संयम राखावा, असे आवाहन अमेरिकेने केले. हा तणाव नाहीसा करण्यास दोन्ही देशांच्या लष्करांनी संपर्क यंत्रणा खुली ठेवावी. दोन्ही देशांच्या लष्करांत परस्पर संपर्क असल्याचे आम्हाला समजले आहे. सतत संपर्क ठेवणे हेच तणाव कमी करण्यासाठी महत्वाचे आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
चर्चा झालेली नाही : भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने चर्चा झालेली नाही, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतील रशियाचे राजदूत व परिषदेचे आॅक्टोबर महिन्यासाठीचे अध्यक्ष विटाली चुर्किन यांनी म्हटले. पाकने काश्मीरचा प्रश्न आणि भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या लष्करी कारवाईचा मुद्दा उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर चुर्किन यांनी ही बाब स्पष्ट केली.
प्रत्येक भारतीयाला पाकिस्तानविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ झालेल्या हव्या आहेत, पण भाजपासारख्या राजकीय भांडवल करण्यासाठी केलेल्या त्या ‘बनावट’ नसाव्यात. राष्ट्रहिताचेही राजकारण होत आहे.
- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
शंकांचे निरसन करण्यासाठी सरकारने ‘सर्जिकल स्ट्राइक्स’चा तपशील जाहीर करावा. पण त्या ‘बनावट’ असल्याच्या निरुपम यांच्या व्यक्तिगत मताशी पक्ष सहमत नाही.
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस
निरुपम यांचे विधान भारतीय लष्कराच्या विश्वासार्हतेवर शंका घेणारे आहे. आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने लष्करावर शंका घेतलेली नाही. लष्कराच्या ‘डीजीएमओं‘नी माहिती देताना तपशील दिला नाही म्हणून कारवाईच्या खरेपणावरच शंका घेणे म्हणजे भारतीय जवानांच्या हौतात्म्याची खिल्ली उडविण्यासारखे आहे.- संबित पात्रा, प्रवक्ते, भाजपा