मोदींकडून मतपेट्यांचे राजकारण; अखिल भारतीय हिंदू महासभेचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:28 AM2018-09-16T01:28:30+5:302018-09-16T06:33:16+5:30
एससी-एसटी कायद्यात नुकत्याच करण्यात आलेल्या दुरुस्त्या मागे घेण्यात आल्या नाहीत, तर मी मोदी यांच्याकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागणार आहे, असे पूजा शकुन पांडे म्हणाल्या.
अलिगढ : अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (एससी-एसटी अॅक्ट) नुकतीच केलेली दुरुस्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतपेट्यांचे राजकारण आहे, असा आरोप अखिल भारतीय हिंदू महासभेने केला. या आरोप केलेल्या पत्रावर रक्ताची सही आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेच्या चिटणीस पूजा शकुन पांडेय यांनी मी स्वत:ला ठार मारून घेईन, अशी धमकी दिली आहे. एससी-एसटी कायद्यात नुकत्याच करण्यात आलेल्या दुरुस्त्या मागे घेण्यात आल्या नाहीत, तर मी मोदी यांच्याकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागणार आहे, असे पूजा शकुन पांडे म्हणाल्या. या पत्रावर मी व इतर १४ सदस्यांनी रक्ताने स्वाक्षरी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची तरतूद सुप्रीम कोर्टाने यावर्षी रद्द केली होती. संसदेने पावसाळी अधिवेशनात वरील आदेश रद्द करणाऱ्या दुरुस्त्यांना संमती दिली होती.
हिंदू न्यायालय स्थापन
शरीयत न्यायालयांच्या धर्तीवर हिंदू महासभेने नुकतेच हिंदू न्यायालय स्थापन केले व पूजा शकुन पांडेय यांना न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केले. उच्चवर्णीय व इतर मागासवर्गीयांच्या हक्कांवर मोदी सरकार अतिक्रमण करीत असल्याचा आरोप पांडेय यांनी केला होता.