राजकारणापाई संसार मोडला, स्वाती सिंह यांनी पती दयाशंकर सिंह यांना घटस्फोट देण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 07:35 PM2022-03-21T19:35:21+5:302022-03-21T19:36:05+5:30
Uttar Pradesh Politics News: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला बहुमत मिळून आता सरकार स्थापनेची वेळ आली असतानाच राज्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या संसारात वादळ आले आहे. भाजपा नेते दयाशंकर सिंह यांना घटस्फोट देण्याचा निर्णय त्यांची पत्नी स्वाती सिंह यांनी घेतला आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला बहुमत मिळून आता सरकार स्थापनेची वेळ आली असतानाच राज्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या संसारात वादळ आले आहे. भाजपा नेते आणि आमदार दयाशंकर सिंह यांना घटस्फोट देण्याचा निर्णय त्यांची पत्नी आणि मावळत्या उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री स्वाती सिंह यांनी घेतला आहे. स्वाती सिंह यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आधीपासून सुरू असलेला घटस्फोटाचा खटला पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी स्वाती सिंह यांनी फॅमिली कोर्टात अर्ज दिला आहे.
स्वाती सिंह यांनी २०१८ मध्येच घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. मात्र तेव्हा दोन्ही पक्ष कोर्टात हजर न राहिल्याने कोर्टाने ही केस बंद केली होती. मात्र आता स्वाती सिंह यांनी अॅडिशनल प्रिंसिपल जजच्या कोर्टामध्ये ही केस पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज दिला आहे. त्यावर न्यायमूर्तींनी आपला निर्णय राखून ठेवला आहे.
नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी स्वाती सिंह आणि दयाशंकर सिंह यांच्यातील वाद उफाळून आला होता. त्यावेळी या पती-पत्नींनी सरोजिनीनगर मतदारसंघावर दावा केला होता. मात्र पक्षाने दोघांनाही उमेदवारी नाकारत राजेश्वर सिंह यांना उमेदवारी दिली होती. ते तिथून विजयी झाले. तर दयाशंकर सिंह हे बलिया येथून विजयी झाले. मात्र स्वाती सिंह यांना उमेदवारी मिळाली नव्हती.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात सामान्य गृहिणी ते आमदार आणि नंतर मंत्री असा स्वाती सिंह यांचा प्रवास अनेक नाट्यांनी भरलेला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दयाशंकर सिंह यांनी बसपाप्रमुख मयावतींबाबत अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर संतापाची लाट उसळल्याने भाजपाने त्यांना पक्षातून काढले होते. त्याचवेळी नसीमुद्दीव सिद्दिकी आणि बसपाच्या इतर नेत्यांनी स्वाती सिंह आणि त्यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तिथूनच पेटून उठलेल्या स्वाती सिंह यांनी बसपा आणि मायावतींविरोधात आघाडी उघडली. त्यानंतर भाजपाने त्यांची थेट पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. तसेच स्वाती सिंह यांना सरोजिनीनगर येथून उमेदवारीही देण्यात आली. तिथे त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. पुढे त्या योगींच्या सरकारमध्ये मंत्रीही झाल्या.
मात्र नंतर पती दयाशंकर सिंह आणि पत्नी स्वाती सिंह यांच्यातील संबंध बिघडत गेले. तसे या दोघांतील संबंध बिघडल्याच्या बातम्या २०१७ मध्येच येऊ लागल्या होत्या. मात्र स्वाती सिंह मंत्री बनल्यानंतर प्रकरण शांत झाले. स्वाती सिंह यांनी घटस्फोटासाठीही आधीच अर्ज केला होता. मात्र दोन्ही पक्ष कोर्टात न आल्याने २०१८ मध्ये केस बंद झाली होती. आता ही केस पुन्हा सुरू करण्यासाठी कोर्टात अर्ज आला आहे.