बिहारमध्ये राजकारण तापले; नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 03:29 AM2022-04-24T03:29:36+5:302022-04-24T03:30:20+5:30
नितीशकुमार यांच्याशी हातमिळवणी करण्याची शक्यता राजदने फेटाळली
एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला हजेरी लावल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवणी करून नितीशकुमार सरकार स्थापन करणार असल्याचा तेजप्रताप यादव यांचा दावा राजदने फेटाळून लावला. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी तर म्हटले आहे की, राजदमध्ये नितीशकुमार यांच्यासाठी कोणतीही रिक्त जागा नाही. त्यांना राजदकडून कोणतीही खुर्ची मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जगदानंद सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला आहे. राजदकडे अशी कोणतीही खुर्ची नाही, ज्यावर त्यांना बसविले जाईल. त्यांनी जनादेश लुटला असला तरी सर्वसामान्य जनता व गरिबांबाबत त्यांचे विचार काय आहेत? राबडीदेवी यांच्या निवासस्थानी झालेली इफ्तार पार्टी राजकीय कार्यक्रम नव्हता. नितीशकुमार भाजपवर कोणता दबाव आणू पाहत आहेत, हे तेच जाणोत.
राजकीय चर्चा
इफ्तार पार्टीच्या वेळी राजकीय चर्चा झाली, असे सांगून लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांनी या भेटीबाबतची उत्सुकता वाढविली.
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते व आमचे सरकार येऊ शकते, असेही ते म्हणाले. तथापि, नितीशकुमार यांनी स्पष्ट केले की, तेजस्वी यादव यांच्या इफ्तार पार्टीतील माझ्या हजेरीचे राजकीय अर्थ काढू नयेत.
भाजपवर निशाणा
भाजपवर निशाणा साधताना जगदानंद सिंह म्हणाले की, बाबू वीरकुंवर सिंह यांचा विजयोत्सव ज्या पद्धतीने साजरा केला जात आहे.
त्याच भाजपच्या शासन काळात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही आणि ते बंधुत्त्वाच्या गोष्टी करीत आहेत.