नात्यागोत्याच्या राजकारणाचा विळखा; घरातच सत्ता राहण्यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 06:08 AM2021-03-27T06:08:16+5:302021-03-27T06:08:34+5:30
राज्याच्या १४० जागांपैकी २० जागांवर राजकारण्यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी एलडीएफचे मंत्री, आमदार, विरोधी पक्ष काँग्रेसप्रणित यूडीएफमधून अनेकजण नशीब अजमावत आहेत.
थिरुवनंतपुरम : राजकारणात घराणेशाही असते याला केरळदेखील अपवाद नाही. मुलगा, मुली, भाऊ, जावई यांच्याभोवतीच केरळचेही राजकारण फिरते आहे. ही निवडणूकही त्याला अपवाद नसल्याचे दिसले आहे. सर्वच पक्षांनी आपल्या घरातच सत्ता राहावी यासाठी प्रयत्न केले आहेत.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे जावई आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. ए. मोहम्मद रियाज हे प्रथमच निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. बीयपूर येथून ते आपले भवितव्य अजमावत आहेत. त्याच वेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची मुले खासदार के. मुरलीधरन आणि पद्मजा वेणुगोपाल यांना अनुक्रमे नेमोम आणि थ्रीसूरमधून उमेदवारी दिली आहे. पी. विजयन हे धर्मादममधून लढत आहेत.
राज्याच्या १४० जागांपैकी २० जागांवर राजकारण्यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी एलडीएफचे मंत्री, आमदार, विरोधी पक्ष काँग्रेसप्रणित यूडीएफमधून अनेकजण नशीब अजमावत आहेत. राजकीय विश्लेषक जे. प्रभाष यांच्या मतानुसार राजकारणात नातलग, व्यापारी आणि अपक्षांना महत्त्व आहे. राजकीय पक्षांच्या अनुसार लोक त्यांना स्वीकारतात, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाते. गंमत म्हणजे हे राजकारणी एकीकडे म्हणतात लोक स्वीकारतात म्हणून त्यांची निवड केली जाते. दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातो. जेंव्हा पक्षाची धोरणे आणि नियम बाजूला सारून अशा लोकांची निवड होते, त्यावेळी राजकारण हे उघडे पडते.
तीन मंत्र्यांचे पुत्र अजमावत आहेत नशीब
यंदा निवडणुकीत तीन मंत्र्यांचे पुत्र नशीब अजमावत आहेत. माजी मंत्री इब्राहीम कुंजू ज्यांना आयुएमएलने डावलले. त्यांचे चिरंजीव पी. ई. अब्दुल गफूर (कलामेसरी) हे उभे आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार के. अच्युतन (युडीएफ) यांचे चिरंजीव सोमेश के. अच्युतन, माजी मंत्री एन. विजयन पिल्लई यांचे चिरंजीव एलडीएफचे उमेदवार डॉ. व्ही. सुजित (चावरा), माजी मंत्री थॉमस चंडी यांचे बंधू थॉमस के. थॉमस (कुट्टनाड), माकपचे सचिव ए. विजयराघवन यांच्या पत्नी आर. बिंदू (इरंजलकुड्डा), सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांचे जावई पी. व्ही. श्रींजीन (कुन्नुथुनाद) हे आपले नशीब अजमावत आहेत.
काँग्रेस नेते पी. जे. जोसेफ यांचे जावई डॉ. जोस जोसेफ (कोथंमगलम) हे उभे आहेत. त्याशिवाय माजी मंत्री एम. के. मुनीर (कुडुवेली), शिबू बेबी जॉन (छावरा), अनुप जेकब (पिरावोम), के. एस. सबरीनाथन (अरुविक्करा) हेही आपले नशीब अजमावत आहेत. मागील विधानसभेत सहा मंत्र्यांची मुले निवडून आली होती.