राजधानीतील महापुरावरून राजकारण; दिल्लीत पूरस्थिती जैसे थे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 05:40 AM2023-07-16T05:40:46+5:302023-07-16T05:42:33+5:30
यमुनेची पाणीपातळी घटू लागली, पूरस्थिती जैसे थे; आता मदतकार्यावर भर
सुनील चावके
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीवर हिमाचल प्रदेश आणि हरयाणामुळे ओढवलेले परप्रांतीय महापुराचे संकट तूर्तास जैसे थेच असून, आता त्यावरुन राजकारण सुरू झाले आहे. काही महत्त्वाच्या रस्त्यांचा अपवाद वगळता जनजीवन संथगतीने पूर्वपदावर येत आहे. सर्व काही ठीक राहिले तर २०८.६२ मीटरचा ऐतिहासिक जलस्तर गाठणाऱ्या यमुना नदीची शनिवारी रात्री २०६.७२ मीटरवर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संघटना युद्धपातळीवर काम करून मदतकार्यासोबतच रस्ते आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात गुंतले आहेत.
शनिवारी सकाळी ११ वाजता यमुनेची पातळी २०७.४३ मीटरवर होती. याच वेगाने पाणी ओसरत राहिले आणि हिमाचल प्रदेश तसेच हरयाणात पाऊस आला नाही तर रात्री ११ वाजेपर्यंत यमुनेचा जलस्तर २०६.७२ मीटरवर येईल, असे दिल्लीच्या महसूल सचिवांचे म्हणणे आहे. दिल्लीतील यमुनेची पातळी ओसरत असली तरी महत्त्वाचे रस्ते अजूनही पाण्याखालीच आहेत. आयटीओ, राजघाट, शांतीवन, सिव्हिल लाइन्स, यमुना बाजार, यमुना खादर या भागात पाणी शुक्रवारप्रमाणे साचलेलेच होते. दिल्लीला पुराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘एनडीआरएफ’ची १६ पथके मदतकार्यात गुंतली होती. तीन दिवसांत यमुनेच्या काठावरील २५ हजारांहून अधिक पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
हथिनीकुंडातील पाणी दिल्लीकडेच कसे?
nदिल्लीत आलेल्या महापुरासाठी जबाबदार कोण यावरून आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. मार्गदर्शक तत्त्वांना बाजूला ठेवून हथिनीकुंडातील पाणी केवळ दिल्लीकडे येणाऱ्या पूर्व कालव्यातून सोडण्यात आल्याचा आरोप जलपुरवठामंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला.
nहरयाणा आणि हिमाचल प्रदेशातून आलेल्या पुरामुळे दिल्लीतील यमुनेला पूर आला. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हथिनीकुंडातून कशा पद्धतीने पाणी सोडले जाते, याची चौकशी व्हायला हवी, असे महसूलमंत्री आतिशी म्हणाल्या.
पुरात अडकला तब्बल
१ कोटीचा “प्रीतम”
दिल्लीसह नोएडातील अनेक भाग पुराच्या तडाख्यात आहेत. ‘गाझियाबाद एनडीआरएफ’च्या पथकाने नोएडाच्या पूरग्रस्त भागातून तब्बल १ कोटी रुपयांच्या “प्रीतम”नावाच्या सांडसह ३ गुरांची सुटका केली. भारतातील नंबर १ सांड “प्रीतम”ची सुखरूप सुटका केली, असे एनडीआरएफने ट्विटरवर लिहिले.