निरोप समारंभात दिसले राजकारण; सेंट्रल हॉलमध्ये काय काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 10:26 AM2023-09-20T10:26:01+5:302023-09-20T10:26:44+5:30
संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भारताला संसदेची नवीन इमारत मिळाल्यामुळे इतिहास घडत असताना सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमात राजकारण पाहायला मिळाले.
संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना पुढच्या रांगेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते, यात शंका नाही; पण नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना त्यांच्या उजव्या बाजूला सोनिया गांधी यांच्या शेजारी बसवण्यात आल्याचे पाहून राजकीय निरीक्षकांना आश्चर्य वाटले.
सोनिया गांधी यांच्या जाऊ मनेका गांधी यांना खासदारांमधून बोलण्यासाठी बोलविण्यात आले; पण त्यांनाच का? त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले आहे. त्यांचा मुलगा वरुण गांधी यांना पक्षाने कोणतीही जबाबदारी दिलेली नाही; पण मनेका गांधी लोकसभेत आठव्यांदा आलेल्या असून, ज्येष्ठ सदस्य आहेत.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करताना नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे. ही चर्चा सुरू असताना अनेक खासदार त्यांच्याकडे पाहत होते.
भाजप नेते नरहरी अमीन पडले बेशुद्ध
भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य नरहरी अमीन हे बेशुद्ध पडल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. गृहमंत्री अमित शाह, वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि इतर काही नेते अमीन यांच्या दिशेने धावले. ६८ वर्षीय अमीन यांना अधिकारी पाणी देताना दिसले. नंतर बरे वाटल्याने अमीन हेही फोटो काढण्यासाठी आले.