राहुल, सोनिया गांधी यांना मतदान करा, मायावतींचा बसप कार्यकर्त्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:18 AM2019-05-06T06:18:11+5:302019-05-06T06:18:31+5:30
उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व रायबरेलीमध्ये यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांना मतदान करण्याचा आदेश बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना रविवारी दिला.
लखनौ : उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व रायबरेलीमध्ये यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांना मतदान करण्याचा आदेश बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना रविवारी दिला.
लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा उद्या सोमवारी पार पडणार असून त्यावेळी या दोन्ही ठिकाणीही मतदान होणार आहे. मायावती यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे सप-बसपने आघाडी करताना काँग्रेसला दूर ठेवले. मात्र भाजपला पराभूत करण्यासाठी बसप कार्यकर्ते, समर्थकांनी अमेठी, रायबरेलीमध्ये काँग्रेस उमेदवारांना मतदान करावे. लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या चार टप्प्यांमध्ये जनतेने सप-बसप आघाडीलाच पाठिंबा दिला असून त्यामुळे भाजप अस्वस्थ झाला आहे. सप-बसप आघाडी देशाला केवळ नवा पंतप्रधानच देणार नाही तर उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात राज्य सरकारही स्थापन करणार आहे. अहंकारी राजवटीपासून देशाची लोकसभा निवडणुकांच्या दिवशी म्हणजे २३ मे रोजी मुक्तता होणार आहे.
मोदींकडून खोटानाटा प्रचार
सप-बसप युती तुटावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप प्रयत्न केल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. बसपला अंधारात ठेवून काँग्रेस व सप यांच्या एकत्रित कारवाया सुरू असतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील प्रतापगढच्या प्रचारसभेत म्हणाले होते. त्याला उत्तर देताना मायावती म्हणाल्या की, सप, बसपच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी मोदी खोटानाटा प्रचार करत आहेत. फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी वापर चालविला आहे. सप-बसपची युती केवळ लोकसभा निवडणुकांपुरती नाही तर आगामी निवडणुकांतही ती कायम राहणार आहे.