पोल्लाचीमधील सेक्स स्कँडलवरून राजकारण तापले, सत्ताधारी अण्णा द्रमुक अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:53 AM2019-03-23T05:53:00+5:302019-03-23T05:53:26+5:30
लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर एका सेक्स स्कँडलमुळे सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष भलताच अडचणीत आला आहे. या पक्षाशी संबंधित एक जण या सेक्स स्कँडलमधील आरोपी असल्याचे उघड होताच, त्याची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली.
- असिफ कुरणे
लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर एका सेक्स स्कँडलमुळे सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष भलताच अडचणीत आला आहे. या पक्षाशी संबंधित एक जण या सेक्स स्कँडलमधील आरोपी असल्याचे उघड होताच, त्याची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली. तरीही सत्ताधारी बड्या नेत्याचा या स्कँडलशी संबंध असल्याचे आरोप विरोधकांनी सुरू केले आहेत. विरोधकांनी विधानसभेचे उपाध्यक्ष व्ही. जयरामन यांचे उघडपणे नावच घेतले आहे. ते पोल्लाची मतदारसंघातूनच निवडून आले आहेत. त्यांनी आरोपाचा इन्कार करून आरोप करणारे द्रमुकचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांच्या जावयावर खटलाही दाखल केला आहे. त्याचा निकाल काहीही लागो, पण अण्णा द्रमुक व सरकार यांची या प्रकरणामुळे अडचण मात्र झाली आहे.
कोइम्बतूर जिल्ह्यातील पोल्लाची शहरातील एका टोळक्याने ५०हून अधिक महिला, मुलींचा लैंगिक छळ केल्याचे प्रकरण ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात उघड झाल्याने सत्ताधारी अण्णा द्रमुक अडचणीत आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना अण्णा द्रमुकच्या नेत्याची साथ होती, असा आरोप द्रमुकसह विरोधी पक्षांनी केला आहे.
पोल्लाची प्रकरण चिघळण्याची लक्षणे दिसताच, अण्णा द्रमुकने एका नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली. आरोपींचे सत्ताधारी अण्णा द्रमुकमधील वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. सरकारने संतप्त लोकभावना लक्षात घेत, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. मात्र, या प्रकरणात निवडणुकीत मोठा परिणाम होऊ शकेल. फेब्रुवारीमध्ये एका तरुणीने आपणास ब्लॅकमेल करून लैंगिक छळ केल्याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. पोलिसांनी तिरूवरूकुरासू (वय २६ ), सतीश (२९ ), सबरीराजन (२७) व वसंतकुमार (२६) या चौघांना अटक केली. त्यातील तिघांना जामीन मिळाला आहे. पोलिसांना संशयित आरोपींच्या मोबाइलमध्ये ५०हून जास्त महिला व युवतींचे आक्षेपार्ह व्हिडीओ व छायाचित्रे सापडल्याचे उघड झाले आहे. डॉक्टर, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शिक्षिकांवर केलेल्या अत्याचाराच्या व्हिडीओंचा समावेश आहे.
तामिळनाडूच्या राजकीय, सामाजिक राजकारणात हे प्रकरण उग्र रूप घेऊ लागले आहे. तक्रारदार तरुणीच्या भावाला धमकावल्याबद्दल अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना सत्ताधारी पाठीशी घालत असल्याचा आरोप करून, द्रमुकने सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत वाढविल्या आहेत. आरोपींविरोधात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू असून, त्याला द्रमुक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. एम. के. स्टॅलिन, कणिमोळी यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे, तसेच सरकारने दोषींविरोधात कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्टॅलिन व वायको यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
पोल्लाची शहरातील तिरूवरूकुरासु, सतीश, सबरीरजन, वसंतकुमार हे फेसबुकवर महिलांच्या नावाने अकाउंट काढून महिला, युवतींशी संपर्क साधत. बहुतांश प्रकरणात ते त्यांच्याशी सेक्सविषयी चॅट करत.
फेसबूकवर मैत्री झाल्यानंतर हे टोळके त्यांचा मोबाइल नंबर घेत असे आणि त्यावर महिला, युवतींसोबत कामोत्तेजक गप्पा करे. नंतर खरी ओळख सांगून हे संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत भेटायला बोलवित. महिला, मुली जाताच, त्यांचा लैंगिक छळ करून त्याचे व्हिडीओ बनवित. या टोळक्याने सात वर्षांत २५० पेक्षाहून अधिक महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे.