सात राज्यांमध्ये आज ५१ जागांसाठी मतदान, अनेक दिग्गजांचे भवितव्य होणार यंत्रबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:06 AM2019-05-06T06:06:25+5:302019-05-06T06:06:48+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य सोमवारी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य सोमवारी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी सात राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही पाचवी फेरी असून, त्यामध्ये ६७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. ८ कोटी ७५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
या फेरीमध्ये महिला उमेदवारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या टप्प्यामध्ये सुमारे साडेतीन लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बिहारमध्ये भारत-नेपाळ सीमा बंद करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांच्या जोडीलाच सीमा सुरक्षा दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
हे बडे नेते आहेत मैदानात
या टप्प्यामध्ये संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, राज्यवर्धन राठोड, जयंत सिन्हा, स्मृती इराणी, अर्जुन मेघवाल, राजीव प्रताप रुडी हे प्रमुख मैदानामध्ये आहेत. याशिवाय कृष्णा पुनिया, पूनम सिन्हा, सुबोधकांत सहाय आदी नेतेही निवडणूक लढवित आहेत.
भाजपसमोर आव्हान : या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४ जागांवर लढाई होत असून, त्यातील १२ जागा भाजपच्या ताब्यात होत्या. सपा-बसप-आरएलडीच्या आघाडीनंतर बदललेल्या स्थितीत या जागा राखणे हे भाजपसमोर आव्हान असेल.
रालोआचा प्रभाव विरोधक नाहीसा करतील - यादव
बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचा प्रभाव विरोधकांची आघाडी नाहीसा करील, असा शरद यादव यांनी व्यक्त केला. - वृत्त/सुपरव्होट
मोदी सरकारने अर्थव्यवस्था धोक्यात आणली - मनमोहन सिंग
मोदींचा पाच वर्षांचा काळ युवक, शेतकरी, लोकशाही यंत्रणेसाठी विनाशकारी होता. या सरकारने अर्थव्यवस्था धोक्याच्या पातळीवर आणून ठेवली, अशी टीका डॉ. मनमोहन सिंग यांनी केली.
कोणत्या राज्यात किती जागा?
बिहार (५), जम्मू-काश्मीर (२),झारखंड (४), मध्य प्रदेश (७), राजस्थान (१२), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (७) या राज्यांमधील ५१ जागांसाठी लढत होत आहे.