पोटनिवडणुकांत भाजपाला दणका, मतदारांनी दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 06:31 AM2018-03-15T06:31:33+5:302018-03-15T06:31:33+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतच भाजपाचा धुव्वा उडाला.
लखनौ/पाटणा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतच भाजपाचा धुव्वा उडाला. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला आहे. पुढील लोकसभा निवडणुकांसाठी ही धोक्याची घंटा मानले जाते.
गोरखपूरमधून आदित्यनाथ पाच वेळा लोकसभेवर गेले होते. त्यापूर्वी महंत अवैद्यनाथ तीन वेळा जिंकले होते. २७ वर्षांनंतर भाजपाची ही जागा गेली. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रवीण कुमार निषाद यांनी भाजपाचे उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. फुलपूरमध्ये सपाचे नागेंद्र सिंग पटेल यांनी भाजपाचे कशलेंद्र सिंग पटेल यांचा ५९ हजार मतांनी पराभव झाला. दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
>बिहारचा सत्ताधाऱ्यांना झटका : च्बिहारमधील जेहानाबाद विधानसभा मतदारसंघातून राजदचे कुमार कृष्ण मोहन यांनी सत्ताधारी जनता दल (यू) चे अभिराम शर्मा यांचा ३५ हजार मतांनी पराभव केला, तर अरारिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे सर्फराज आलम यांनी भाजपाच्या प्रताप सिंग यांना पराभूत केले.
>आम्ही सपा-बसपा आघाडीला गांभीर्याने घेतले नाही. असे निकाल आम्हाला अपेक्षित नव्हते.
- योगी आदित्यनाथ,
मुख्यमंत्री, युपी
विरोधकांच्या एकीला मिळाले बळ
या निकालांनंतर बिगरभाजपा आघाडी बनण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. आपण एकत्र आल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे, असे अनेक विरोधी नेत्यांनी म्हटले आहे. ती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे दिसते. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाच आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपाचा पराभव केल्याबद्दल दोन्ही राज्यातील मतदारांचे आभार मानले आहेत.