मध्य व उत्तर गुजरातमध्ये वळणार आता मोर्चा, दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:52 AM2017-12-11T01:52:09+5:302017-12-11T01:52:11+5:30
दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमधील पहिल्या टप्प्यातील मतदान समाप्त झाल्यानंतर, आता भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दुस-या टप्प्यातील मतदानाच्या मतदार संघात मोर्चा सांभाळणार आहेत.
महेश खरे/लोकमत न्यूज नेटवर्क
सुरत : दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमधील पहिल्या टप्प्यातील मतदान समाप्त झाल्यानंतर, आता भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दुस-या टप्प्यातील मतदानाच्या मतदार संघात मोर्चा सांभाळणार आहेत. मध्य आणि उत्तर गुजरातच्या ९३ जागांवर १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
भाजपाने कार्यकर्त्यांना या ठिकाणी पाठविण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप दिले आहे. ईव्हीएमच्या निगराणीसाठी कोण असेल आणि आपल्या पसंतीच्या भागात कोण जबाबदारी सांभाळणार? याचे नियोजन पूर्ण झाले आहे.
संपर्काचे लाभ घेण्याचा प्रयत्न
दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमधील कार्यकर्ते, नेते यांच्या संपर्काचा फायदा उठविण्याचा प्रयत्न काँग्रेस
आणि भाजपाकडून होत आहे. ज्या नेत्यांचे मध्य आणि उत्तर गुजरातच्या गाव, शहरात संपर्क आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना ११ डिसेंबरपर्यंत येथे पोहोचून प्रचार कार्यात सक्रिय होण्यास सांगण्यात आले आहे.
५२ जागांवर पाटीदार निर्णायक
पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील किमान ५२ जागा अशा आहेत, जिथे पाटीदार समुदाय निर्णायक आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून पाटीदार समुदायाला आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतदानाच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्री विजय रूपानी खोडलधाम येथे गेले होते. लेउवा पटेलांची ही एक धार्मिक संस्था आहे. या ट्रस्टने नंतर जाहीर केले की, खोडलधाम संस्था विजय रूपानी यांना पाठिंबा देत आहे, तर काही वेळातच ट्रस्टचे नरेश पटेल यांचे चिरंजीव शिवराज यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. मात्र, अध्यक्ष नरेश पटेल यांनी सांगितले की, हा ट्रस्ट राजकीय नसून धार्मिक आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थन करीत नाहीत.
दिनेश बांभणिया यांचा दणका
मतदानाच्या पूर्वसंध्येला अचानक एक पत्रकार परिषद घेऊन पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचे निकटवर्तीय दिनेश बांभणिया यांनी काँग्रेस आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समितीशी नाते तोडले. त्यांचा आरोप होता की, काँग्रेस आरक्षणाच्या मुद्द्यावर पाटीदारांशी खेळ करीत आहे. काही दिवसांपूर्वी वरुण पटेल आणि रेशमा पटेल यांनी आंदोलन समितीचा राजीनामा दिला होता.
दीड लाख पोलीस तैनात
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्र आणि इतर ठिकाणी दीड लाख पोलीस तैनात करण्यात आले होते. याशिवाय इंडो तिबेटियन पोलीस जवानांनाही तैनात करण्यात आले होते. दोन्ही टप्प्यांतील निवडणुकीसाठी २.४१ लाख कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १२.३७ लाख नव्या मतदारांनी प्रथमच मतदान केले.