विधान परिषदेसाठी खुले मतदान?
By admin | Published: August 10, 2016 03:50 AM2016-08-10T03:50:44+5:302016-08-10T03:50:44+5:30
विधान परिषद निवडणुकीसाठी खुली मतदान पद्धती घेण्याबाबत केंद्र सरकारने राज्यांची मते मागविली आहेत. पैशांचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीच्या धर्तीवर हे प्रयत्न सुरू आहेत
नवी दिल्ली : विधान परिषद निवडणुकीसाठी खुली मतदान पद्धती घेण्याबाबत केंद्र सरकारने राज्यांची मते मागविली आहेत. पैशांचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी राज्यसभा निवडणुकीच्या धर्तीवर हे प्रयत्न सुरू आहेत.
कायदा मंत्रालयाचे अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्यात जानेवारीत झालेल्या एका बैठकीत निवडणूक आयोगाने हा मुद्दा उपस्थित केला होता. कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी त्यानंतर या प्रकरणी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही दिले आहे. या पद्धतीनुसार विधान परिषदेसाठी मतदान करणाऱ्या आमदाराला आपल्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला ती मतपत्रिका दाखवावी लागेल. द्विसदनप्रणाली असणाऱ्या सात राज्यांपैकी आंध्र प्रदेश, तेलंंगणा आणि बिहारने आयोगाला पाठविलेल्या आपल्या उत्तरात खुल्या मतदान पद्धतीचे समर्थन केले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश या राज्यांत विधान परिषद आहे.
निवडणूक आचरण नियमावली, १९६१ च्या नियम ३९ एए नुसार राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदाराला (आमदाराला) मतपेटीत मतपत्रिका टाकण्यापूर्वी पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवावी लागते. ही मतपत्रिका दाखविण्यास विरोध करणाऱ्या आमदाराची मतपत्रिका बाद ठरू शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)