सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ५ मे रोजी मतदान
By admin | Published: March 30, 2015 11:34 PM2015-03-30T23:34:55+5:302015-03-31T00:24:10+5:30
९७ व्या घटनादुरुस्तीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे ‘राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले.
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक वेळापत्रकावर प्रशासनाने शेवटचा हात फिरविला असून, दि. ४ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल, तर मतदानाचा मुहूर्त दि. ५ मे रोजी असेल. मतमोजणी दि. ७ मे रोजी होईल. दरम्यान, कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक राजेंद्र दराडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक महसूल विभागानेच घ्यावी, अशी सूचना राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी केली होती. त्यानुसार सातारचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; पण ते प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी विनंती केल्यामुळे सातारा जिल्हा बँकेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कोण असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
जिल्हा बँकेची निवडणूक सहकार विभागाच्या अखात्यारित होत असली तरी प्रत्येक वेळी झालेली निवडणूक प्रक्रिया महसूल विभागानेच राबविली. मात्र, ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे ‘राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले. त्याच्या आयुक्तपदी मधुकर चौधरी यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक महसूल विभागानेच घ्यावी, अशी सूचना चौधरी यांनी केली होती. त्यानुसार दि. ३० मार्चला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यासाठी प्रांताधिकारी माने यांची नियुक्ती झाली; पण त्यांनी प्रतापगड कारखाना निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी असल्याचे सांगितले. आता त्यांच्याऐवजी कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक डॉ. दराडे यांची नियुक्ती झाली आहे. (प्रतिनिधी)
असा असेल कार्यक्रम !
दि. ४ ते ८ एप्रिल अर्ज भरणे, दि. ९ रोजी अर्जांची छाननी, दि. ११ ते २४ एप्रिलपर्यंत अर्ज माघार घेणे. दि. ५ मे रोजी मतदान आणि ७ मे रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम असण्याची शक्यता आहे. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.