नद्यांचे प्रदूषित भाग सतत वाढत आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:09 AM2018-09-18T01:09:09+5:302018-09-18T01:09:37+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष; देशात दोन वर्षांपूर्वी ३०२, आता ३५१
नवी दिल्ली : देशातील नद्यांचे प्रदूषित भाग दोन वर्षांपूर्वी ३०२ होते ते यावर्षी ३५१ झाले असून, अतिशय गंभीररीत्या प्रदूषित झालेल्या नद्यांचे भाग (जेथे पाण्याचा दर्जा कसा आहे हे समजते) ३४ वरून ४५ झाले आहेत. हा निष्कर्ष केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) काढला आहे.
केंद्र सरकार गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प राबवत असून, प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी तो दृश्य स्वरूपातील प्रयत्न आहे. सीपीसीबीने बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांचे भाग हे प्रत्यक्ष महाराष्ट्र, आसाम आणि गुजरातमधील नद्यांपेक्षा खूप कमी प्रदूषित आहेत, असे म्हटले. नद्यांच्या प्रदूषित झालेल्या ३५१ भागांपैकी ११७ भाग हे या तीन राज्यांतील आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या शिफारशींच्या आधारे सीपीसीबीने गेल्या महिन्यात राज्यांना त्यांच्या नद्या किती प्रदूषित झाल्या आहेत, हे कळवले आहे. सीपीसीबीने प्रदूषित भागांकडे लक्ष वेधले आहे त्यात मिठी नदीत (पोवई ते धारावी) बीओडी (बायोकेमिकल आॅक्सिजन डिमांड) २५० मिलीग्रॅम/लिटर, गोदावरीत (सोमेश्वर ते राहेद) बीओडी ५.०-८० मिलीग्रॅम/लिटर, साबरमती (खेरोज ते वौथा) बीओडी ४.०-१४७ मिलीग्रॅम/लिटर आणि हिंडोन (सहारनपूर ते गाझियाबाद) बीओडी ४८-१२० मिलीग्रॅम/लिटर आहे.
देशातील अनेक नद्या खूप प्रमाणात प्रदूषित
उत्तर प्रदेशातील नद्यांच्या प्रदूषित भागांच्या केलेल्या संकलनात गंगेत बीओडीचे प्रमाण ३.५-८.८ मिलीग्रॅम/लिटर असून, ही नदी प्रायोरिटी फोरमध्ये असल्याचे संकेत आहेत. गंगा नदीचे सांस्कृतिक महत्त्व मोठे असल्यामुळे तिच्यावर सतत प्रकाशझोत असतो; परंतु अनेक नद्या खूप प्रमाणात प्रदूषित आहेत, असे केंद्रीय जल संसाधन मंत्रालयातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.