दिल्लीतील प्रदूषण; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी केजरीवाल रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 12:37 PM2017-11-15T12:37:44+5:302017-11-15T12:41:10+5:30
दिल्लीमधील प्रदूषण आणि धुरक्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज चंदिगढ येथे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भेटत आहेत.
नवी दिल्ली- गेल्या आठवड्यापासून राजधानी दिल्लीमध्ये असणाऱ्या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत. दिल्ली आणि परिसरामध्ये सकाळपासूनच धुरके तयार झाल्यामुळे दृश्यताही कमी झाली आहे. प्रदुषणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे निश्चित केले होते मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केजरीवाल आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भेटण्यासाठी चंदिगढला जाऊन पोहोचले आहेत.
.@capt_amarinder Sir, I am coming to Chandigarh on Wed to meet Haryana CM. Would be grateful if u cud spare sometime to meet me. It is in collective interest
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 14, 2017
अरविंद केजरीवाल यांच्यावर अमरिंदर सिंग यांनी काल सडकून टीका केली होती. ''अशा प्रकारच्या कोणत्याही चर्चेमधून काहीही मिळणार नाही. प्रत्येक मुद्दयाचे राजकारण करण्याची केजरीवाल यांची सवय सर्वांनाच माहिती आहे. दिल्लीमधील प्रदुषणामागे शहरातील प्रदुषके आणि बांधकामे कारणीभूत आहेत असे सांगून कोणत्याही प्रकारची बैठक घेण्याचा प्रश्नच येत नाही'' अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांच्या बैठकीच्या मागणीला सिंग यांनी धुडकावून लावले. आपली मागणी सिंग यांनी फेटाळल्यानंतरही केजरीवाल यांनी काल, "मी उद्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत आहे, तुम्हीही भेटलात तर फार बरे होईल, हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे" असे ट्वीट केले होते.
दिल्ली राजधानी क्षेत्र हे राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांनी वेढलेले आहे. या राज्यांमध्ये नवे पीक घेण्यासाठी शेतजमिनीवरच आधीच्या पिकाचे पाचट आणि इतर तण जाळले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि परिणामी सर्वच क्षेत्राची हवा प्रदुषित होते. मागील वर्षी दिल्ली हायकोर्टाने या राज्यांना ही शेतजमिनीवर गवत, पाचट जाळण्याची पद्धती बंद करावी अशा अत्यंत कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन न झाल्यास संबंधित राज्याच्या मुख्य सचिवाला जबाबदार धरू असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आर्द्रता आणि धूर एकत्रित होऊन धुरके तयार होत असल्याचे दिसून येते. गेल्या सोमवारपासून दिल्लीच्या हवेच्या गुणवत्ता अत्यंत खालावल्याचे दिसून येते. त्यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे गॅस चेंबर झाले आहे असे विधान केले होते.