रेड झोनची चाहूल: दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वत्र प्रदूषण; वायू गुणवत्ता निर्देशांक ‘रोगट’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 12:15 AM2020-10-14T00:15:19+5:302020-10-14T00:15:35+5:30
राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशात काडी-कचरा जाळल्याने धुरांचे लोट हवेत
विकास झाडे
नवी दिल्ली : आठवडापूर्वी-दिल्ली एनसीआरमध्ये असलेली स्वच्छ हवा आता नाहीशी झाली आहे. दिल्लीत आज कॅनॉटप्लेस आणि गाझिपूर हा भाग वगळता सर्वत्र रोगट हवा होती. वायु गुणवत्ता निर्देशांकात लोकांच्या आरोग्यास हानिकारक हवा असल्याचे नोंदविण्यात आले आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. अजय नागपुरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, दिल्लीतील वायु गुणवत्ता निर्देशांक आता रेडझोनमध्ये येण्याची ही चाहुल आहे.
दिल्लीच्या केंद्रस्थानी असलेल्या कॅनॉटप्लेस परिसरातील हवा अत्यंत स्वच्छ नोंदविण्यात आली. परंतु त्यालगतच्या ल्युटीयन्स झोन, संसद, राष्ट्रपती भवन, विविध देशांचे दुतावास असलेल्या परिसरातील वायु निर्देशांक हा आरोग्यास हानिकारक १२५ ते २०० पर्यंत नोंदविण्यात आला. आज सर्वाधिक प्रदूषित नोएडा सेक्टर १९८ ठरले. येथील वायू गुणवत्ता निर्देशांक १९८ होता. केंद्र आणि राज्य सरकारने पराळी आणि शेतातील तण जाळू नका अशा शेतकऱ्यांना सूचना दिल्या असल्या तरी, पराळी व कचरा मोठ्या प्रमाणात जाळायला सुरुवात झाली आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील काही भागामध्ये पराळी जाळल्याने धुरांचे लोट हवेत पसरत आहेत. याचा परिणाम दिल्ली आणि एनसीआरमधील लोकांच्या आरोग्यावर होत आहे. एकिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचे प्रदूषण जीवघेणे ठरणार आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीतील शेतांमध्ये ‘पुसा डी-कंपोजर’ची फवारणी करायला सुरुवात केली आहे. परंतु इतर राज्यात अशी धडक मोहिम राबविण्यात आली नाही.
दिल्लीत पराळी हेच प्रदूषणाचे एकमेव कारण नाही तर कोरोनामुळे लोकांनी खासगी वाहनांस प्राधान्य दिले आहे. वाहनांमुळे रोगट हवेत भर पडत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिल्लीसह एनसीआर परिसरातील १० वर्ष जुन्या डिझल गाड्यांसह १५ वर्ष जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी आणली आहे. वाहतूक विभागाने वाहनांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. त्यात कार चालवण्यापुर्वी कारला हवा ‘वार्मअप’ करणे, चाकात हवेचा दाब योग्य ठेवणे, सिग्नलवर इंजिन बंद करावे, वेळोवेळी कारची सर्व्हिसिंग करण आणि इंधनांची गुणवत्ता तपासणे.