पोंझी घोटाळा : ‘ईडी’कडून २६१ कोटींच्या मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 02:16 AM2019-08-18T02:16:38+5:302019-08-18T02:26:56+5:30
पोंझी योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हरियाणास्थित एका बहुस्तरीय मार्केटिंग समूहाच्या २६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या आहेत.
नवी दिल्ली : पोंझी योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हरियाणास्थित एका बहुस्तरीय मार्केटिंग समूहाच्या २६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या आहेत.
ईडीने शनिवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. ईडीने म्हटले की, हरियाणाच्या हिसारमधील फ्यूचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. ही कंपनी आणि तिचे दोन संचालक राधेश्याम व बन्सीलाल तसेच त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांच्या मालकीच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. त्यात भूखंड, शेतजमिनी आणि निवासी इमारती यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
हिसार, आदमपूर, कुलाम, दिल्ली आणि चंदीगड येथील १६ स्थावर मालमत्ता, तसेच ३४ बँक खात्यांतील २५२ कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य २६१ कोटी रुपये आहे, असे ईडीने म्हटले
आहे.
योजनेचे सदस्य होण्यासाठीही लोकांकडून पैसे घेतले जात असत. कंपनीने देशभरात आपले जाळे निर्माण केले होते. या योजनेतून कंपनीने कोट्यवधी रुपये उभे केले. हा पैसा बेकायदेशीररीत्या कंपनीचे संचालक, तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक खात्यावर वळता करण्यात आला.
मार्चमध्ये तेलंगणा पोलिसांकडून कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. ‘दरमहा २० हजार ते १० लाख रुपये कमावण्याची जीवनाला कलाटणी देणारी संधी’ अशी जाहिरातबाजी करून कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते.
पिरॅमिड मार्केटिंग योजनेद्वारे कपडे आणि खाद्य पदार्थ यासारख्या वस्तू विकून भरमसाट कमिशन देण्याचे आमिष दाखविले. लवकर फसू शकणारे लोक कंपनीचे मुख्य टार्गेट होते. नवीन सदस्य जोडण्यासाठी आधीच्या सदस्यांना भरमसाट कमिशन दिले जात होते.