बिहारमध्ये पूजा, हवन करण्यास बंदी
By admin | Published: April 28, 2016 12:05 PM2016-04-28T12:05:23+5:302016-04-28T12:45:11+5:30
वाढत्या तापमानामुळे राज्यातील अनेक भागांत आगीच्या घटना समोर येत आहेत, या पार्श्वभुमीवर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
पाटणा, दि. 28 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आग न पेटवण्याचे आवाहन करणारं परिपत्रक काढण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. तसंच कोणाला पूजा किंवा हवन करायचे असल्यास सकाळी 9 च्या आधी उरकून घ्या अन्यथा संध्याकाळी 6 नंतर करा असेही आदेश देण्यात आले आहेत. वाढत्या तापमानामुळे राज्यातील अनेक भागांत आगीच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.
नितीश कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य सचिव यांना परिपत्रक काढून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. आगीच्या घटनांचा आढावा घेत असताना नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांत पाटणा, नालंदा, भोजपूर, रोहतस, बक्सर आणि भाबुआ या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
ऊर्जा सचिव यांनादेखील वीजेच्या तारांची पाहणी करुन सैल असलेल्या विजेच्या वायरी दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत देण्याचे आदेशही अधिका-यांना देण्यात आले आहेत. आगीशी लढण्यासाठी लागणा-या उपकरणांची खरेदी करण्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.