पूजा खेडकर दोषी, आयएएस पद गेले; उमेदवारी रद्द, पुढे परीक्षा देण्यासही मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:55 AM2024-08-01T05:55:43+5:302024-08-01T05:56:20+5:30

बनावटगिरीवर यूपीएससीची कारवाई : नागरी सेवा परीक्षा-२०२२च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

pooja khedkar convicted cancellation of candidature prohibition of further examination | पूजा खेडकर दोषी, आयएएस पद गेले; उमेदवारी रद्द, पुढे परीक्षा देण्यासही मनाई

पूजा खेडकर दोषी, आयएएस पद गेले; उमेदवारी रद्द, पुढे परीक्षा देण्यासही मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) रद्द केली तसेच तिला भविष्यात यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षा देण्यास तसेच तिच्या निवडीवर कायमस्वरुपी बंदी घातली आहे. 

यूपीएससीने एका निवेदनात म्हटले आहे की, पूजा खेडकरशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता तिने नागरी सेवा परीक्षा-२०२२च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. तिने आयएएसची २०२२ साली परीक्षा दिली होती. त्यावेळची तिची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.  

कागदपत्रे सादर केली नाहीत

स्वत:बद्दल खोटी माहिती देऊन परीक्षा दिल्याच्या आरोपावरून यूपीएससीने तिला १८ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तिने २५ जुलै रोजी आपले उत्तर सादर करणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी तिने ही मुदत ४ ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली होती.  आवश्यक कागदपत्रे सादर करण्याकरिता ही विनंती करत असल्याचे पूजाने म्हटले होते. त्यामुळे तिला यूपीएससीने ३० जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मुदत वाढवून दिली होती. मात्र तिने कागदपत्रे सादर केली नाहीत असे यूपीएससीने म्हटले आहे. 

१५,००० उमेदवारांची कागदपत्रे तपासली, मात्र आढळले काही नाही

पूजा खेडकरचे प्रकरण उजेडात आल्यानंतर २००९ ते २०२३ या कालावधीत आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १५००० उमेदवारांच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी करण्यात आली होती. मात्र पूजा वगळता अन्य कोणत्याही उमेदवाराने नागरी सेवा परीक्षा नियमांचा भंग केल्याचे आढले नाही, असे यूपीएससीने म्हटले. पूजा खेडकरने आयएएस परीक्षा देण्यासाठी केवळ आपलेच नव्हे तर पालकांचेही नाव बदलून माहिती सादर केली होती. या बनावट माहितीच्या आधारे तिने आयएएसची काही वेळा परीक्षा दिली. ही बाब त्याचवेळी उघडकीस येऊ शकली नव्हती. सक्षम अधिकाऱ्याने सादर केलेले प्रमाणपत्र अस्सल मानले जाते. आता स्पर्धा परीक्षांसाठी असलेल्या एसओपीत आता सुधारणा करून ती अधिक कडक करण्यात येणार आहे, असेही यूपीएससीने म्हटले आहे. 

अटकपूर्व जामिनावर आज निकाल

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी तसेच उमेदवारी रद्द झालेली आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली न्यायालय १ ऑगस्ट रोजी निकाल देणार आहे. या प्रकरणाचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्रकुमार जंगला यांनी बुधवारी राखून ठेवला. मला अटक होण्याची शक्यता असल्याने आपण हा अर्ज केला असल्याचा युक्तिवाद पूजाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. मात्र या अर्जाला सरकारी वकील तसेच यूपीएससीच्या वकिलानेही विरोध केला. 


 

Web Title: pooja khedkar convicted cancellation of candidature prohibition of further examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.