घोटाळे की आणखी कोणते कारण? मनोज सोनी यांनी अचानक सोडले 'यूपीएससी'चे अध्यक्षपद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 06:31 AM2024-07-21T06:31:20+5:302024-07-21T06:31:29+5:30
परीविक्षाधीन (प्रोबेशनरी) आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत केलेले कारनामे समोर आल्यानंतर 'यूपीएससी'वर चहूबाजूंनी टीका होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. वास्तविक सोनी यांचा कार्यकाळ मे २०२९ पर्यंत होता. पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी राजीनामा दिला.
परीविक्षाधीन (प्रोबेशनरी) आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत केलेले कारनामे समोर आल्यानंतर 'यूपीएससी'वर चहूबाजूंनी टीका होत आहे. यूपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोनी यांनी राजीनामा दिला आहे. तथापि, सोनी यांच्या राजीनाम्याचा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे यूपीएससीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
कोण आहेत सोनी? शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध ५९ वर्षीय मनोज सोनी हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. यूपीएससीमध्ये नियुक्तीआधी ते गुजरातच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्याआधी ते बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू होते. १६ मे २०२३ रोजी त्यांनी यूपीएससी अध्यक्षपदाची शपथ घेतली होती.
१५ दिवस आधीच...
सोनीनी १५ दिवस आधीच राजीनामा दिला होता. तो आता स्वीकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यूपीएससी अध्यक्ष बनण्यास सोनी उत्सुकच नव्हते.
ही तर हकालपट्टी : खरगे
मनोज सोनी यांनी राजीनामा दिला नसून यूपीएससीतील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पदावरून दूर करण्यात आल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.